केंद्र सरकारने केला आसामी जनतेचा घात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:15 AM2019-12-22T06:15:05+5:302019-12-22T06:15:15+5:30
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद
मेघना ढोके
देशाला आमचा प्रश्नच कळलेला नाही. माध्यमे नागरिकत्व कायद्याचा प्रश्न हिंदू-मुस्लीम असा मांडत आहेत, पण आसाम व ईशान्य भारतासाठी विदेशातून आलेले, येणारे लोंढे हा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. नागरिकत्व कायद्याला आम्ही करो या मरो या वृत्तीने विरोध करू, आसाम कदापि बांगलादेशी लोंढ्यांना स्वीकारणार नाही, असं स्पष्ट मत आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुलकुमार महंतो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलं.
१९८०च्या दशकात आसाममध्ये तरुणांनी परप्रांतीय लोंढ्यांच्या विरोधात सहा वर्षे चालविलेल्या आंदोलनाचे महंतो नेते होते. आसाम करार हे या आंदोलनाचेच फलित. त्यातूनच महंतो यांची आसाम गण परिषद सत्तेत आली. आसामचे मसिहा अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र, नंतर ते भाजपसोबत गेल्याने त्यांच्यावर टीका खूप झाली. नागरिकत्व कायदाप्रश्नी त्यांनी आसामच्या भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.
एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय?
पूर्ण विरोध. शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करू. आसामींच्या जगण्यावरच आक्रमण होणार असेल, आसामात आम्ही अल्पसंख्य होणार असू तर जगायचं कसं, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. बंगाली लोंढे लादणारा हा घातक कायदा
आहे.
देशभर एनआरसी करू, अशा घोषण होत आहेत. त्यातच नागरिकत्व दुरुस्ती कायदा...
तेच दुर्दैव आहे, आसामींनी एनआरसी शांतपणे निभावली, पण नव्या कायद्याने केंद्र सरकार ती मोडीत काढतेय. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू बंगाली लादून आसामलाच ‘बंगालीबहुल’ करण्याचा हा डाव आहे.
..पण पुढे काय?
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, हेच आता मोदी सरकार बदलायला निघाले असेल, तर आम्ही आसामी आणि ईशान्य भारतीय तरी त्याचा प्राणपणाने विरोध करू. आम्हाला कोणत्याच धर्माचे ‘बिदेशी’ लोक नकोत, आम्ही हे लोंढे अनेकदा स्वीकारले आणि पस्तावलो आहोत. यापुढे आसामसह ईशान्य भारतात जो काही असंतोष उसळेल आणि त्याचे जे परिणाम होतील त्यांना केवळ केंद्र सरकार जबाबदार असेल. आसामी माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा कुणी पाहू नये! आमची भाषा, संस्कृती, रोजगार व अस्तित्व यावरच हा घाला आहे. एनआरसीचा खेळ झाला, जो विषण्ण करणारा आहे.
बांगलादेशातील हिंदू बंगाली लादून आसामला ‘बंगालीबहुल’ करण्याचा हा डाव आहे. - प्रफुलकुमार महंतो