Corona Vaccination : ७४ काेटी डोससाठी केंद्र सरकारने दिल्या ऑर्डर, लसीकरणासाठी ५० हजार काेटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 07:16 AM2021-06-09T07:16:13+5:302021-06-09T07:16:48+5:30
Corona Vaccination : केंद्राने या माेहिमेसाठी ७४ काेटी डाेससाठी विविध कंपन्यांना ऑर्डर्स दिल्याची माहिती निती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी दिल्ली: देशातील संपूर्ण काेराेना लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वत:कडे घेत असल्याची घाेषणा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केली. या माेहिमेसाठी तब्बल ५० हजार काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्राने या माेहिमेसाठी ७४ काेटी डाेससाठी विविध कंपन्यांना ऑर्डर्स दिल्याची माहिती निती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काेराेना लसीकरण माेहिमेत १८ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचे पंतप्रधान माेदींनी साेमवारी जाहीर केले हाेते. या माेहिमेबाबत अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली. सरकारकडे लसीकरणासाठी पुरेसा निधी असून, तत्काळ कुठल्याही पुरवणी निधीची गरज नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कदाचित दुसऱ्या टप्प्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुमारास गरज भासू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. लसीकरण माेहीम सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायाेटेक आणि बायाे-ई या कंपन्यांवर केंद्रित असून, बहुतांश लाेकसंख्येला त्यातून लसी देता येतील, अशी अपेक्षा सूत्रांनी वर्तविली आहे.
परदेशी लसींवर अवलंबन नाही
देशाच्या लसीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी परदेशी लसींवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याचेही अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. फायझर आणि माॅडर्ना या कंपन्यांच्या लसी सध्यातरी भारतात उपलब्ध हाेण्याची शक्यता नाही. भारतातील अटींबाबत चर्चा सुरूच आहे. तसेच जानेवारीपर्यंत माॅडर्नाची भारतात प्रवेश करण्याची याेजना नाही. स्पुतनिक-व्ही या रशियन लसीला भारतात मंजुरी मिळाली आहे. मात्र, माेठा साठा उपलब्ध हाेण्याची शक्यता कमीच आहे. केंद्राने ही लस खरेदी करण्यास अद्याप सुरुवातही केलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
७४ काेटी डाेससाठी ऑर्डर्स
संपूर्ण लसीकरणासाठी केंद्र सरकारने ७४ काेटी डाेससाठी ऑर्डर्स दिल्या आहेत. काेविशिल्डचे २५ काेटी, काेव्हॅक्सिनचे १९ काेटी आणि बायाेलाॅजिकल-ई या कंपनीच्या लसीचे ३० काेटी डाेस खरेदी करणार असल्याची माहिती डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी दिली. त्यापैकी काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिनचे ४४ काेटी डाेसचा पुरवठा तातडीने सुरू हाेणार असून, सर्व डाेस डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यात उपलब्ध हाेणार आहेत. त्यासाठी ३० टक्के आगावू रक्कम ‘सीरम‘ आणि भारत बायाेटेकला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बायाेलाॅजिकल-ई या कंपनीच्या लसीची किंमत किती असेल, यासाठी आपण प्रतीक्षा करू, असेही डाॅ. पाॅल यांनी सांगितले.