केंद्राचा दुजाभाव? निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीच्या मदतीपोटी दिले केवळ २६८ कोटी
By बाळकृष्ण परब | Published: November 13, 2020 02:13 PM2020-11-13T14:13:59+5:302020-11-13T14:21:05+5:30
Cyclone Nisarga News : निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
नवी दिल्ली - यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेमहाराष्ट्रातील कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता केंद्र सरकारने निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपोटी महाराष्ट्राला केवळ २६८.५९ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी मदत म्हणून केंद्र सरकारने सहा राज्यांना ४ हजार ३८१ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल, ओदिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम अशा एकूण सहा राज्यांना ही मदत देण्यात येणार आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ही मदत मंजूर केली आहे.
यामध्ये अम्फान चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओदिशा या राज्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही निसर्ग चक्रीवादळाने मोठी हानी घडवून आणली होती. त्यामुळे मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम बंगालला २ हजार ७०७.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर ओदिशाला १२८.२३ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्रासारख्या राज्यांना अम्फान निसर्ग यांसारख्या वादळांनी तडाखा दिला. तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांना पुराचा सामना करावा लागला. तसेच सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. गृह मंत्रालयाद्वारे ही मदत नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फंडांतर्गत मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २६८. ५९ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्राने १ हजार ४० कोटींची मदत मागितली असताना कमी मदत देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याचप्रमाणे पुरामुळे नुकसान झालेल्या राज्यांनाही मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकला ५७७.८४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशला ६११ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूस्खलनामुळे नुकसानीचा सामना करणाऱ्या सिक्कीमला ८७.८४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.