काश्मीरच्या अशांततेला केंद्र सरकार जबाबदार
By admin | Published: June 5, 2017 04:13 AM2017-06-05T04:13:00+5:302017-06-05T04:13:00+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि अस्वस्थतेचा ठपका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ठेवला
लोकमत न्यूज नेटवर्क
चेन्नई : जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि अस्वस्थतेचा ठपका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ठेवला. ते रविवारी येथे म्हणाले, ‘केंद्र सरकार काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळत असून, भाजप-पीडीपी ही काश्मीरमधील युती ‘अकार्यक्षम’ आहे.
काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करू हे दिलेले आश्वासन पोकळ ठरले आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी अरुण जेटली मला भेटायला आले होते. तुम्ही काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळत आहात व काश्मीरला आगीच्या तोंडी उभे करीत आहात, असे मी त्यांना सांगितले.
जेटली यांनी माझे म्हणणे दूर सारून काश्मीरमध्ये शांतता असल्याचे सांगितले, असे राहुल गांधी म्हणाले. भारत सरकार आणि पंतप्रधान काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशावर एकच विचार लादण्याचा व देशाची विविधता धोक्यात आणण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव विरोधी पक्ष एक होऊन उधळून लावतील.
देशावर एकच विचार थोपावला जातोय
प्रत्येक राज्याला स्वत:चा विचार आणि संस्कृती, अभिव्यक्ती आणि खानपान आहे. ही विविधता हेच देशाचे बळ आहे, दुबळेपणा नाही, असे राहुल गांधी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. जी शक्ती आहे तो भाजपसाठी दुबळेपणा आहे व वेगवेगळ्या कल्पना तो नष्ट करू पाहतोय. देशावर एकच विचार थोपवता येईल, असा विचार तो करतोय, असा आरोप त्यांनी केला.