चीनी स्मार्टफोन वैयक्तिक माहिती चोरत असल्याची भीती, केंद्र सरकारची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 04:00 PM2017-08-16T16:00:48+5:302017-08-16T16:05:42+5:30
केंद्र सरकारने हॅकिंगच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याची भीती व्यक्त करत स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहे
नवी दिल्ली, दि. 16 - केंद्र सरकारने हॅकिंगच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याची भीती व्यक्त करत स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये विवो, ओप्पो, शिओमी आणि जिओनी या चीनी कंपन्यांचा समावेश आहे. मोबाईल फोन मेकर्स कंपन्या हँकिंग करत असल्याची भीती केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्व: चीनी मोबाईल कंपन्या रडारवर आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
चीनी मोबाईल कंपन्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट चोरत असल्याची भीती केंद्र सरकारला वाटत आहे. केंद्र सरकारकडून एकूण 21 मोबाईल कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये फक्त चीनी कंपन्यांचा समावेश नसून भारतीय कंपन्याही उल्लेख आहे. अॅप्पल, सॅमसंगसहित भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सलाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
'सर्व कंपन्यांना सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं आहे की नाही याची माहिती देण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. सर्वांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी आम्ही ऑडिट करणार आहोत', अशी माहिती अधिका-याने दिली आहे. केंद्र सरकारने अशावेळी हे पाऊल उचललं आहे जेव्हा भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन वाद सुरु आहे.
भारत सर्व आव्हानांचा सामना करण्यास तयार, डोकलाम वादावर मोदींचा चीनला इशारा
विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनादिवशी केलेल्या आपल्या भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचं नाव न घेता भारत सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं होतं. मग ते आव्हान समुद्री भागातून असो अथवा सीमेवरुन, भारत सर्व आव्हानांशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं पंतप्रधान मोदी बोलले होते. मोदींनी यावेळी चीनचा उल्लेख न करता हा इशारा दिला होता. देशाची सुरक्षा आपल्या सरकारची प्राथमिकता असून, सीमारेषा सुरक्षित ठेवण्यासाठी जवनांना तैनात करण्यात आल्याचंही ते बोलले होते.
डोकलाम वादात मंदावणार मेट्रोचा वेग?
डोकलाम वादावर भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून, तणाव निवळण्याऐवजी वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर चीनसोबत करण्यात आलेला नागपूर मेट्रो रेल्वेसाठी कोच खरेदी आणि कारखाना निर्मितीचा करार रद्द होऊ शकतो. त्यामुळे मेट्रोची ‘स्पीड’ मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने उच्चस्तरीय वर्तुळात हालचाली सुरू झालेल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या वादावर पूर्णविराम लागल्यास मेट्रो रेल्वेच्या मार्गात निर्माण होवू पाहणार हा अडथळा लवकरच दूर होईल, असेही ‘मेट्रो रेल्वे’च्या उच्चपदस्थ वर्तुळात बोलले जात आहे.