केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:11 AM2021-03-16T05:11:03+5:302021-03-16T05:11:43+5:30
शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही.
बागपत : केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करीत असलेल्या शेतकऱ्यांची बाजू मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी घेतली असून, आंदोलकांचे मन दुखवू नका, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाकेले. मलिक रविवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की,‘शेतकऱ्यांना केंद्र सरकारने किमान आधारभूत भावाची हमी दिली तर शेतकरी विरोध कमी करतील.’ आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांना अटक होईल, अशा अफवा पसरल्यावर मी अटकेला प्रतिबंध केला, असा दावा मलिक यांनी केला. (The central government should guarantee a MSP, says Meghalaya Governor Satya Pal Malik)
शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. त्या देशाला वाचवले जाऊ शकत नाही. त्यामुळे लष्कर आणि शेतकरी समाधानी ठेवले गेले पाहिजेत, असे सांगून मलिक यांनी शेतकऱ्यांना दुखवू नका’, असे आवाहन मोदी आणि शहा यांना केले.
शेतकरी दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे
- शेतकऱ्यांची अवस्था वाईट असल्याचे वर्णन करून सत्यपाल मलिक म्हणाले, ‘दिवसेंदिवस ते गरीब होत चालले आहेत तर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दर तीन वर्षांनी वाढत आहे. शेतकरी जे पेरतो ते स्वस्त आणि तो जे काही विकत घेतो ते महाग. आपण गरीब कसे होत आहोत हे त्याला कळत नाही.
- शेतकऱ्यांचे वाटोळे त्यांना काही न समजता होत आहे.
- शेतकरी जेव्हा बी पेरायला जातो तेव्हा त्याला त्याचे पैसे मोजावे लागतात आणि तो जेव्हा ते पीक कापायला जातो तेव्हा त्याचा भाव जवळपास ३०० रुपयांनी खाली आलेला असतो, असेही मलिक म्हणाले.