केंद्र सरकारने मोठ्या भावाची भूमिका निभावली पाहिजेः आप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:50 IST2020-02-17T16:46:22+5:302020-02-17T16:50:26+5:30
सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर दिल्ली सरकार आणि केंद्रात कोणतेही मतभेद आता राहिले नाही.

केंद्र सरकारने मोठ्या भावाची भूमिका निभावली पाहिजेः आप
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासने पूर्ण करणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या भावाची भूमिका निभावून मदत करावी, अशी मागणी केजरीवाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले राजेंद्र पाल गौतम यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जी 10 वचन दिल्लीकरांना दिले होते, ते आधी पूर्ण करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आहे. ज्यात आरोग्य आणि शिक्षण याविषयी अधिक चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार असल्याचे राजेंद्र पाल गौतम म्हणाले.
तर सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर दिल्ली सरकार आणि केंद्रात कोणतेही मतभेद आता राहिले नाही. त्यामुळे नव्याने आलेल्या आमच्या या सरकारला केंद्र सरकार मदत करेल अशी अपेक्षा आहे. तसेच दिल्लीकरांच्या विकासासाठी आम्ही तर प्रयत्न करणारच, पण केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या भावाची भूमिका निभावली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.