तुटीची चिंता न करता केंद्र सरकारने खर्च वाढवावा; माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:46 AM2021-06-02T05:46:07+5:302021-06-02T05:46:37+5:30
अर्थव्यवस्था ठप्प होऊ न देण्याचे आवाहन
नवी दिल्ली : केंद्र सरकारने वित्तीय तुटीची चिंता न करता केंद्र सरकारने खर्च करावा. त्यासाठी गरज भासल्यास कर्ज घ्यावे किंवा चलनी नाेटांची छपाई वाढवावी. मात्र, अर्थव्यवस्था ठप्प पडायला नकाे, असा सल्ला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्राला दिला आहे.
एका ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये चिदंबरम यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्यात आला हाेता. मात्र, आता जून महिना उजाडला असून अर्थसंकल्पीय तरतुदी अद्याप अंमलात आलेल्या नाही.
पहिली लाट ओसरत असल्याचे दिसल्यानंतर सरकारने अर्थव्यवस्थेत सुधारणा हाेत असल्याचे खाेटे स्वप्न रंगविल्याची टीका चिदंबरम यांनी केली.
ते म्हणाले, सरकारने आता खर्च न केल्यास राज्यांवरील आर्थिक संकट वाढेल. राज्यांना जीएसटीमधील हिस्सा लवकरात लवकर दिला पाहिजे. तसे न झाल्यास लसीकरणावरही परिणाम हाेऊ शकताे. वित्तीय तूट ६.५ टक्क्यांपर्यंत वाढली तरी त्याबाबत आता चिंता करण्याची गरज नाही. सरकारने जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात थेट राेख ट्रान्सफर करण्यावर भर दिला पाहिजे, असे चिदंबरम यांनी सांगितले. सरकारला अर्थव्यवस्था सुरळीत चालू ठेवण्याची गरज असून, त्यासाठी भेदभाव न करता राज्यांना निधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशात दाेन वर्षांमध्ये बहुतांश नागरिक गरीब झाले आहेत. जीडीपीमध्ये प्रत्यक्षात ८.२ टक्क्यांची घट झाली आहे. हा गेल्या तीन वर्षांपूर्वीपेक्षाही कमी असल्याचे चिदंबरम म्हणाले.