पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला संमत करायची आहेत २९ विधेयके
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 07:49 AM2021-07-18T07:49:38+5:302021-07-18T07:50:06+5:30
संसदेच्या २० दिवसीय पावसाळी अधिवेशनात सरकारला २९ विधेयके संमत करून घ्यायची असल्याची माहिती सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेतील राजकीय नेत्यांसोबतच्या बैठकीत दिली.
नवी दिल्ली :संसदेच्या २० दिवसीय पावसाळी अधिवेशनात सरकारला २९ विधेयके संमत करून घ्यायची असल्याची माहिती सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेतील राजकीय नेत्यांसोबतच्या बैठकीत दिली. यातील ६ विधेयके सध्याच्या अध्यादेशांची जागा घेतील, तसेच २ विधेयके वित्तीय व्यवहारविषयक आहेत, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कोविड-१९ साथ, शेतकऱ्यांचे आंदोलन, सहकारी संघराज्य, चीनच्या कारवाया आणि जम्मू व काश्मीर यासंबंधी चिंता व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अफगाणिस्तानावर चर्चा घेण्याची सूचना केली. टीएमसीचे डेरेक ओब्रायन यांनी सांसदीय समितीकडून अधिकाधिक विधेयकांची छाननी करण्याची मागणी केली.
बैठकीला २० पक्षांचे नेते
२० पक्षांच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. राज्यसभेचे चेअरमन एम. व्यंकय्या नायडू यांनी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांचे प्रश्न मांडण्याची विनंती पक्षांना केली. राज्यसभेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल पीयूष गोयल यांचे सर्वच राजकीय नेत्यांनी यावेळी अभिनंदन केले. नायडू यांनी म्हटले की, गोयल हे आधी सभागृहाचे उपनेते होते. त्यामुळे त्यांना सांसदीय समन्वयन नवीन नाही.