नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'आयुष्मान भव' कार्यक्रम, अनेकांना मिळतील लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:45 PM2023-09-11T12:45:56+5:302023-09-11T12:47:13+5:30
Ayushman Bhava Program : गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही क्षयरोगाच्या (टीबी) मुद्द्यावर भर दिला होता, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.
नवी दिल्ली : केंद्र सरकार यावर्षी १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आयुष्मान भव’ कार्यक्रम सुरू करणार आहे. यासंबंधीचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया म्हणाले, 'यावर्षी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 'आयुष्मान भव' कार्यक्रम सुरू करणार आहोत, जेणेकरून अंतिम टप्प्यापर्यंत लोकांसह प्रत्येक इच्छित लाभार्थ्यापर्यंत सर्व सरकारी आरोग्य योजना जास्तीत जास्त वितरण सुनिश्चित केल्या जाऊ शकतील.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, या कार्यक्रमादरम्यान शिबिरांचे आयोजन केले जाईल आणि ६०,००० लोकांना आयुष्मान भारत कार्ड दिले जातील. तसेच, आरोग्य सेवा आणि कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावेत, यासाठी येत्या काळात आम्ही हा उपक्रम अधिक वेळा राबवू, असेही मनसुख मंडाविया म्हणाले. दरम्यान, आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) ही जगातील सर्वात मोठी आरोग्य संरक्षण योजना आहे, जी प्रति लाभार्थी कुटुंबाला प्रति वर्ष ५ लाख रुपये आरोग्य कव्हरेज प्रदान करते.
याचबरोबर, गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही क्षयरोगाच्या (टीबी) मुद्द्यावर भर दिला होता, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की क्षयरोग (टीबी) नष्ट करण्याचे जगाचे लक्ष्य २०३० आहे. परंतु भारताचे लक्ष्य २०२५ च्या अखेरीस टीबी नष्ट करण्याचे आहे."
क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी भाजपची योजना
२०२२ मध्ये भाजपने देशाला क्षयरोग (टीबी) मुक्त करण्यासाठी एक वर्षाचा कार्यक्रम सुरू केला होता, ज्या अंतर्गत प्रत्येकजण टीबी रुग्णाला दत्तक घेईल आणि एक वर्ष त्याची काळजी घेईल. २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्षयरोगी रुग्णाला एका वर्षासाठी दत्तक घेण्याची योजना आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला, जे उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एक लहान शहर आहे.