वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार; संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 07:52 AM2024-06-28T07:52:10+5:302024-06-28T07:52:22+5:30
राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबतही सविस्तर विवेचन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील जनतेने मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तिसऱ्यांदा स्पष्ट आणि स्थिर जनादेश दिला आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना सांगितले. यावेळी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबतही सविस्तर विवेचन केले.
आयुष्मान भारत आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत उपचार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १८ वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये नवीन खासदारांचे अभिनंदन करीत मुर्मू यांनी ते भारतातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माध्यम म्हणून काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. युद्धांदरम्यान वर्चस्वासाठी सशस्त्र दलांत सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले.
आणीबाणी हा सर्वांत मोठा काळा अध्याय
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणीबाणी राज्यघटनेवर थेट हल्ल्याचा सर्वांत मोठा आणि काळा अध्याय आहे. अशा असंवैधानिक शक्तींवर देशाने विजय मिळवला,
असे नमूद केले.
- राष्ट्रपतींनी भाषणात आणीबाणीचा उल्लेख केल्यावर काही विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, त्याकडे राष्ट्रपतींनी दुर्लक्ष केले.
२५,००० जन औषधी केंद्रे देशभरात सुरू
- आयुष्मान भारत आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत उपचार देण्यात येणार. देशात २५००० जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
- आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ५५ कोटी लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत.