‘केंद्र सरकार कामगारविरोधी’
By Admin | Published: June 27, 2016 04:42 AM2016-06-27T04:42:19+5:302016-06-27T04:42:19+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत भारतीय मजदूर संघाने त्याला विरोध करणे सुरू केले आहे.
नागपूर : एकीकडे केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याच्या नावाखाली आर्थिक उदारीकरणाला प्रोत्साहन देत असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत भारतीय मजदूर संघाने त्याला विरोध करणे सुरू केले आहे. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाविरुद्ध भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार आहे.
संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संघाच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिरात पार पडली. बैठकीला संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह संघटनेचे देशभरातील ४० नेते उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत मोदी सरकारच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कामगारविरोधी असल्याची टीकाही मजदूर संघाने केली आहे.
सरकार ज्या खुल्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार करीत आहे, त्यामुळे भविष्यात दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या धोरणाविरुद्ध ८ जुलै रोजी जिल्हा पातळीवर थेट आंदोलन करण्याचा निर्णयही संघटनेने घेतला आहे. सर्व खासदारांना हे आर्थिक धोरण कसे चुकीचे आहे, याबाबत निवेदन दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)