केंद्र सरकारची कामगारांना मोठी भेट; किमान वेतनात वाढ, 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 09:48 PM2024-09-26T21:48:27+5:302024-09-26T21:49:10+5:30
केंद्र सरकारने असंघटित कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने गुरुवारी(दि.26) परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) मध्ये सुधारणा करुन देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे. आता कामगारांच्या किमान वेतन दरात प्रतिदिन 1035 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, यामुळे कामगारांना वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत होईल. नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील.
केंद्रीय क्षेत्रातील आस्थापनांतर्गत इमारत बांधकाम, लोडिंग-अनलोडिंग, साफसफाई, घरकाम, खाणकाम आणि कृषी यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना याचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान, अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि उच्च कुशल तसेच भौगोलिक क्षेत्राच्या आधारे किमान वेतन दर अ, ब आणि क श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जातात.
कामगारांसाठी किमान वेतन
या निर्णयानंतर भौगोलिक झोन-ए मध्ये बांधकाम, झाडूकाम, साफसफाई, लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये गुंतलेल्या अकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (रु. 20,358 प्रति महिना), अर्ध-कुशल कामगारांसाठी 868 रुपये प्रतिदिन ( 22,568 रुपये दरमहा) होईल.
तर, कुशल कामगारांसाठी वेतन दर 954 रुपये प्रतिदिन (रु. 24,804 प्रति महिना) असेल आणि उच्च कुशल कामगारांसाठी ते 1,035 रुपये प्रतिदिन (रु. 26,910 प्रति महिना) असेल. केंद्र सरकार 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या किरकोळ महागाईतील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे कामगारांसाठी वर्षातून दोनदा VDA सुधारित करते.