केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावला; उद्या दिल्लीकडे कूच करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 09:43 AM2024-02-20T09:43:53+5:302024-02-20T09:44:12+5:30
सरकारने दिलेल्या प्रस्तावात स्पष्टता नसल्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे डल्लेवाल यांनी सांगितले.
नवी दिल्ली: पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, सोमवारी शंभू सीमेवर शेतकरी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला. शेतकऱ्यांनी २१ फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे.
शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, सरकारच्या हेतूत दोष आहे. सरकार आमच्या मागण्यांवर गंभीर नाही. सरकारने एमएसपी अर्थात २३ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवावी अशी आमची इच्छा आहे. सरकारच्या या प्रस्तावाचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही.
सरकारने दिलेल्या प्रस्तावात स्पष्टता नसल्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे डल्लेवाल यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या प्रस्तावाचे वजन केले तर त्यात काहीच दिसत नाही. आपले सरकार १.७५ लाख कोटी रुपयांचे पामतेल बाहेरून विकत घेते, पण ही रक्कम शेतीसाठी तेलबियांसाठी राखून ठेवली असती तर शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला असता.
२१ फेब्रुवारीला दिल्लीकडे रवाना होणार-
२१ फेब्रुवारीला आम्ही दिल्लीकडे कूच करणार आहोत, असे शेतकरी नेते पढेर सांगतात. सरकारसोबत सध्या कोणतीही बैठक होणार नाही. मात्र आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. डल्लेवाल म्हणाले की, आम्ही सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या मान्य करा किंवा आम्हाला दिल्लीत शांततेने बसू द्या. आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की, हिंसाचार करू नका.