विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्राची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 06:02 AM2021-12-24T06:02:21+5:302021-12-24T06:03:41+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पी. चिदंबरम यांच्यासह अन्य नेत्यांनी बूस्टरसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यास केंद्र सरकारने त्या राज्यांना सांगितले आहे. ओमायक्रॉनमुळे संसर्ग झपाट्याने वाढत असून त्यामुळे राज्यांनी अतिशय दक्ष राहावे, असेही केंद्राने म्हटले आहे.
येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत कमी लसीकरण झालेल्या ठिकाणी संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा भागांत लसीकरणाचा वेग वाढवा अशी केंद्राने त्या राज्यांना सूचना केली आहे. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवावे, जिथे जास्त संख्येने नवे रुग्ण आढळत असतील तिथे कडक निर्बंध लागू करावेत असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. नाताळ व नववर्षाच्या कार्यक्रमात मोठी गर्दी होऊन संसर्ग अधिक पसरू शकतो. हे लक्षात घेऊन अशा कार्यक्रमांवर दिल्ली सरकारने यंदा बंदी घातली आहे. कोणतेही निर्बंध किमान १४ दिवस लागू करा असेही केंद्राने राज्यांना कळविले आहे.
बूस्टरसाठी केंद्र सरकारवर काँग्रेसने वाढविला दबाव
- काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पी. चिदंबरम यांच्यासह अन्य नेत्यांनी बूस्टरसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविला आहे. भलेही सरकारने राज्यांना निर्देश दिले आहेत की, ओमायक्रॉनची अधिक संख्या असलेल्या जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करा. तरीही काँग्रेसने बूस्टरसाठी आग्रह धरला आहे.
- राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशातील मोठ्या लोकसंख्येला अद्यापही लस देण्यात आलेली नाही. केंद्र सरकार बूस्टर कधी सुरू करणार आहे. चिदंबरम यांनी आरोप केला की, सीरमच्या आर्थिक हितासाठी सरकार उत्साहात लाखो भारतीयांना संकटात टाकत आहे.