केंद्रीय गृहसचिवांना मुदतीआधीच घरी पाठविले
By admin | Published: September 1, 2015 02:27 AM2015-09-01T02:27:05+5:302015-09-01T02:27:05+5:30
केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांना मुदतीआधीच ‘स्वेच्छानिवृत्ती’ देऊन त्यांच्या जागी राजीव महर्षी यांची, निवृत्तीच्या दिवशीच, दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांना मुदतीआधीच ‘स्वेच्छानिवृत्ती’ देऊन त्यांच्या जागी राजीव महर्षी यांची, निवृत्तीच्या दिवशीच, दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीने सोमवारी अचानक घडलेल्या या घडामोडींनी नोकरशाहीत खळबळ उडाली.
गोयल यांचा दोन वर्षांचा सेवाकाळ संपायला १७ महिने शिल्लक होते. परंतु त्यांनी वैयक्तिक कारणांवरून केलेली स्वेच्छानिवृत्तीची विनंती मान्य करण्यात आल्याचे अधिकृतपणे सांगण्यात येत असले तरी त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावण्यात आली, असे मानले जात आहे. राजीव महर्षी सोमवारीच सेवानिवृत्त होणार होते. पण आता गृहसचिव नेमण्यात आल्याने ते पुढील दोन वर्षे सेवेत राहतील.
गोयल यांना ‘इंडिया ट्रेड प्रमोशन आॅर्गनायजेशन’च्या (आयटीपीओ) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात येणार आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल. गोयल यांच्यासाठी लगोलग हे पद शोधण्यात आले ही बाबबी त्यांची स्वेच्छानिवृत्ती ही वास्तवात उचलबांगडी आहे, याकडे संकेत करणारी आहे. कार्यकाळ संपण्याच्या आधीच पदावरून हटविण्यात आलेले गोयल हे तिसरे नोकरशहा आहेत. याआधीचे गृह सचिव अनिल गोस्वामी आणि परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना कार्यकाळ संपण्याच्या आधीच घरी पाठविण्यात आले होते.
१९७८ च्या तुकडीतील राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी महर्षी यांच्या प्रभावाने दोन वर्षांसाठी असलेल्या नियुक्तीला पंतप्रधान मोदी यांनी मंजुरी दिली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. महर्षी हे सध्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कामकाज विभागात सचिव आहेत. नोकरशाहीमध्ये महर्षी यांची नियुक्ती वित्तमंत्री अरुण जेटली यांचा व्यक्तिगत विजय मानला जात आहे. जेटली यांनीच महर्षी यांना राजस्थानमधून वित्त मंत्रालयात आणले होते.
बरेच दिवसांची खदखद
सन टीव्हीला सुरक्षा मंजुरी देण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवरून गोयल यांचा काही मंत्रालयांसोबत वाद सुरू होता. तसेच नागा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली त्यावेळी पीएमओने गोयल यांना दुर्लक्षित केले होते. त्याचाही राग गोयल यांच्या मनात खदखदत होता, असे सूत्रांनी सांगितले.
गोयल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. दोघेही केरळ कॅडरमधील आयएएस अधिकारी आहे. गोयल हे गृह सचिव असले तरी त्यांना बाजूला सारूनच अनेक निर्णय घेण्यात येत असल्याने त्यांनी आधी राजीनाम्याचा प्रस्ताव दिलेला होता. परंतु गृहमंत्री राजनाथसिंग यांनी त्यांची समजूत घातली आणि हा मुद्दा मिटला.