सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:26 AM2024-09-20T05:26:21+5:302024-09-20T05:26:46+5:30
याठिकाणी कामाच्या प्रचंड ताणामुळे ही घटना घडल्याबाबत बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून चौकशी करीत असल्याचे मांडविया यांनी सांगितले.
नवी दिल्ली : अर्न्स्ट ॲण्ड यंग ग्लाेबलची कर्मचारी ॲना सेबास्टियन पेरायिल हिच्या मृत्यूसंदर्भात केंद्र सरकारने चाैकशी सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली. याठिकाणी कामाच्या प्रचंड ताणामुळे ही घटना घडल्याबाबत बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून चौकशी करीत असल्याचे मांडविया यांनी सांगितले.
असुरक्षित व शाेषणकारी कामाच्या वातावरणाची चाैकशी कामगार मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती कामगार राज्यमंत्री शाेभा करंदलाजे यांनी साेशल मीडियावर एका पाेस्टद्वारे दिली. २६ वर्षीय ॲना मार्चमध्ये कंपनीच्या पुणे कार्यालयात ऑडिट व अशुरन्स टीममध्ये दाखल झाली होती. चार महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. ॲनाची आई अनिता ऑगस्टिन यांनी मेमानी यांना एक पत्र लिहून मुलीचा मृत्यू कामाच्या ताणामुळे झाल्याचा आरोप केला होता.
कंपनीच्या अध्यक्षांचे पत्र व्हायरल
ॲना पेरायिल हिच्या मृत्यूप्रकरणी कंपनीचे चेअरमन राजीव मेमानी यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेले एक गोपनीय पत्र फुटले असून, ते आता प्रचंड व्हायरल झाले आहे. ‘न्यूज इन मीडिया’ या शीर्षकाच्या या पत्रात मेमानी यांनी ऑगस्टिन यांच्या तक्रारींची दखल घेऊन ॲनाच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.
कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक व कामास पोषक वातावरण निर्माण करण्यास कंपनी बांधील असल्याचे म्हटले आहे. मेमानी यांनी म्हटले की, ॲनाच्या मृत्यूबद्दल मी व्यक्तिश: दु:ख व्यक्त केले असून, कुटुंबाची जी कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.