राज्यपालांवर केंद्राचा अंकुश
By admin | Published: April 13, 2015 06:00 AM2015-04-13T06:00:56+5:302015-04-13T06:00:56+5:30
राज्यपालांनी आपल्या संबंधित राज्यात वर्षातून किमान २९२ दिवस राहिलेच पाहिजे आणि राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय राज्याच्या बाहेर दौरा करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यपालांना
नवी दिल्ली : राज्यपालांनी आपल्या संबंधित राज्यात वर्षातून किमान २९२ दिवस राहिलेच पाहिजे आणि राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय राज्याच्या बाहेर दौरा करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यपालांना दिले आहेत.
काही राज्यांचे राज्यपाल बहुतांश काळ आपल्या संबंधित राज्याच्या बाहेरच वेळ घालवितात, असे लक्षात आल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने हे नवे निर्देश जारी केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमावलीत म्हटले आहे, की राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीशिवाय अथवा आकस्मिक किंवा अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रपती सचिवालयाला पूर्वकल्पना दिल्याशिवाय कोणताही दौरा आयोजित करू
नये. शेवटच्या क्षणी दौरा आयोजित करायचा झाल्यास राज्यपालांना त्या दौऱ्यामागच्या कारणांचा खुलासा करणे अनिवार्य राहील.
राज्याबाहेर दौरा करावयाचा झाल्यास तसे एक ते सहा आठवड्यांपूर्वी राष्ट्रपतींना कळवावे लागेल आणि दौरा खासगी आहे की सरकारी आणि तो देशांतर्गत आहे की विदेशात, यावर त्या दौऱ्याला परवानगी
दिली जाईल. राज्यपालांना दौरा
करण्यापूर्वी आपली विनंती पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्याकडेही पाठवावी लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)