मध्य प्रदेशात काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 03:35 PM2017-09-25T15:35:50+5:302017-09-25T15:36:23+5:30
मध्य प्रदेशात सध्या पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या दरम्यान दातिया जिल्ह्यातील रुहेरा गावातील एका काँग्रेस नेत्याही गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
भोपाळ, दि. 25 - मध्य प्रदेशात सध्या पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या दरम्यान दातिया जिल्ह्यातील रुहेरा गावातील एका काँग्रेस नेत्याही गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्या काँग्रेस नेत्याचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. डीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सत्यम गुर्जर यांच्या माहितीनुसार, पंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीत रुहेरा गावातील काँग्रेस नेते कैलास उर्फ अनिरुद्ध सिंह यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या राजकीय विरोधकांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे.
या गोळीबारात काँग्रेस नेत्याचे पुत्र कुलदीप सिंह सुद्धा गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्याला उपचारासाठी ग्वाल्हेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकऱणात रुहेरा गावातील सरपंच जनकसिंह व त्याच्या 11 साथीदारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा तपास सुरू आहे. मृत्युमुखी पडलेले कैलास सिंह हे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष होते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या हत्येचं प्रमाण वाढत आहे.
महाराष्ट्रातल्या गडचिरोलीतील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते बापू तलांडी यांचीही गेल्या काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. नक्षलवाद्यांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. गडचिरोलीतील निमलगुडा या गावात राहणा-या बापू तलांडी यांना अज्ञात हल्लेखोरांनी गाठले. यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर निमलगुडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याप्रमाणेच उत्तर प्रदेशच्या दादरी भागात भारतीय जनता पक्षाचे नेते विजय पंडित यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच मुजफ्फरनगरच्या मीरपूर भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेते ओमवीर सिंग यांची गोळी झाडून हत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबी कॉलनीतील रहिवासी असलेले भाजपा नेते व माजी सैनिक ओमवीर सिंग हे मोटारसायकलवरून आपल्या शेतात पाणी देण्यासाठी जात होते. वाटेत नंगला चौपड गावात त्यांना काही गुंडांनी लुटण्याच्या इराद्याने रोखले असता त्यांनी विरोध केला. या गुंडांनी त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर त्यांचा मोबाईल व पिस्तूल घेऊन फरार झाले होते. या हत्येच्या विरोधात शेतक-यांनी त्यांचा मृतदेह गावाच्या वेशीवर ठेवून धरणे दिले. पोलीस अधीक्षक मुकेश चंद्र मिश्र यांनी गावक-यांची समजूत घातली व त्यांना परत पाठविले. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.