मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली; किरेन रिजिजू यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:59 AM2023-05-18T11:59:06+5:302023-05-18T12:00:24+5:30

मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली होताच किरेन रिजिजू यांनी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे.

Central Minister Kiren Rijiju has given reaction to his hasty transfer from the ministerial post. | मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली; किरेन रिजिजू यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले...

मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली; किरेन रिजिजू यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले...

googlenewsNext

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रालयाच्या कामांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतरच सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली होताच किरेन रिजिजू यांनी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण किरेन रिजिजू यांनी दिलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किरेन रिजिजू यांचे कायदा मंत्रिपद काढून घेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.  

किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खासदार आहेत. किरेन रिजिजू यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९७१ रोजी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी २००४ मध्ये (अरुणाचल पश्चिम मतदारसंघ) पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. पण २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१४च्या निवडणुकीत रिजिजू पुन्हा विजयी झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहराज्यमंत्री बनवण्यात आले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच २०१९मध्ये त्यांना क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. जुलै २०२१मध्ये, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान कायदा मंत्री करण्यात आले. रविशंकर प्रसाद यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.

कोण आहे अर्जुन राम मेघवाल?

अर्जुन राम मेघवाल हे २००९पासून बिकानेरचे खासदार आहेत. मेघवाल यांचा जन्म बिकानेरच्या किसमिदेसर गावात झाला. बिकानेरच्या डुंगर कॉलेजमधून बीए आणि एलएलबी केले. यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी (M.A) केली. यानंतर त्यांनी फिलिपाइन्स विद्यापीठातून एमबीएही केले. ते राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत आणि राजस्थानमधील अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मेघवाल २००९, २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बिकानेरमधून भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. २०१३मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे मुख्य व्हीप होते. मे २०१९मध्ये मेघवाल संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बनले. आता त्यांच्याकडे कायदा मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

Web Title: Central Minister Kiren Rijiju has given reaction to his hasty transfer from the ministerial post.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.