अर्भक मृत्यू रोखण्यासाठी केंद्रीय पथक कोटामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:15 AM2020-01-04T03:15:00+5:302020-01-04T03:23:01+5:30
रुग्णालयाची करणार पाहणी; आणखी सुविधा देणार, आतापर्यंत १0३ अर्भकांचा मृत्यू
कोटा : राजस्थानातील कोटा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जे. के. लोन रुग्णालयात अर्भकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी निष्णात बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेले एक वैद्यकीय पथक केंद्र सरकारने तिथे गुरुवारी पाठविले आहे. या रुग्णालयात १ डिसेंबरपासून आतापर्यंत १०३ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, जे. के. लोन शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय उपचारांच्या सोयी, त्यात असलेल्या उणिवा, मनुष्यबळाचा, तसेच वैद्यकीय साधनसामग्रीची कमतरता अशा अनेक गोष्टींबाबत केंद्राने पाठविलेले वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक रुग्णालयाची पाहणी करेल. तसेच राजस्थान सरकारच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहे. त्यातून या रुग्णालयात आवश्यक सर्व सुविधा, तसेच आर्थिक साहाय्य देण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल. या रुग्णालयाला शक्य ती सर्व मदत केंद्रातर्फे केली जाईल, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दूरध्वनीवरील चर्चेत हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने कोटाला पाठविलेल्या वैद्यकीय पथकामध्ये एम्स जोधपूर येथील बालरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. कुलदीप सिंह, डॉ. दीपक सक्सेना, एम्स जोधपूरमधील डॉक्टर अरुण सिंह, राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्राचे सल्लागार डॉ. हिमांशू भूषण यांचा समावेश आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारीला जे. के. लोन रुग्णालयात तीन अर्भकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णालयात महिनाभरात शंभराहून अधिक अर्भके मरण पावल्याने खळबळ माजली होती. हे प्रकार रोखण्यासाठी तातडीने पावले उचला, असा आदेश काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना गुरुवारी दिला होता. (वृत्तसंस्था)
अनेक उपकरणे कालबाह्य
कोटा येथील जे. के. लोन रुग्णालयात ५३३ महत्त्वाची उपकरणे असणे आवश्यक आहे. मात्र, तिथे फक्त त्यातील २१३ उपकरणेच आहेत.
तीच स्थिती इन्फ्युजन पंप, बीपी मोजण्याचे उपकरण, एक्स-रे यंत्रांची आहे. या रुग्णालयात असलेल्या खाटांपेक्षा तिथे येणाºया रुग्णांची संख्या खूपच जास्त आहे. अशा अनेक समस्यांमुळे तिथे नीट उपचार होत नाही, अशी टीका होते.
20 पैकी 14 व्हेंटिलेटर,
38 पैकी 32 पल्स आॅक्सिमीटर,
28 पैकी 22 नेब्युलायझर कालबाह्य झाली आहेत.