केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात येणार; शेतकऱ्यांना मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे शहांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 05:12 PM2019-11-04T17:12:55+5:302019-11-04T17:13:19+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज सकाळी दिल्लीत आगमन झाले. त्यांनी लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : अवकाळी आलेल्या पावसाने झालेल्या पिकांचे नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज सकाळी दिल्लीत आगमन झाले. त्यांनी लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासाठी केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी करणारे निवेदन आज मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना सोपविले.
केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सोपविल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने महाराष्ट्रातील जवळपास १२५ तालुक्यांतील शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेलेले आहेत. ही मोठी आपत्ती असून यासाठी केंद्र सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारने नुकसानाची आढावा घेण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांचे पथक तातडीने पाठवावे, अशी विनंती शहा यांच्याकडे करण्यात आली. ही विनंती मान्य करण्यात आली.
GoI has given a positive assurance to help the farmers of Maharashtra. My interaction with media after meeting Hon HM @AmitShah ji in New Delhi. https://t.co/CHBLc7v5bL#ओला_दुष्काळpic.twitter.com/WtDFO73uQv
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2019
यावेळी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, यासाठी विमा कंपन्यांना निर्देश द्यावे, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विमा कंपन्यांची बैठक घेण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.