विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यावर केंद्रीय विद्यापीठांचे मंथन; जमिया, जेएनयू, बीएचयू यांनी घेतला सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:59 PM2020-09-09T23:59:48+5:302020-09-10T07:09:21+5:30
पोलीस, विद्यार्थ्यांशी संपर्क वाढविण्याची सहभागी प्रतिनिधींची सूचना
नवी दिल्ली : कॅम्पसमधील सततची निदर्शने आणि पोलिसी कारवाई यामुळे हैराण झालेल्या मोठ्या केंद्रीय विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना शिस्त कशी लावता येईल, या विषयावर ऑनलाईन चर्चा केली. जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये जमियासह जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू), अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जमिया हमदर्द या विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.
जमियाच्या कुलगुरू नजमा अख्तर या वेबिनारच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी सांगितले की, खरे म्हणजे विद्यापीठ कॅम्पसमध्ये शांतता कायम राखण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाचे आहे; पण आता यात पोलिसांना सहभाग घ्यावा लागत आहे. पोलिसांची भूमिकाही आता आमूलाग्र बदलली आहे. ते आता विद्यार्थ्यांचे मित्र झाले आहेत. अधिक मानवीय पद्धतीने समस्या कशी हाताळावी हे ते जाणतात.
विद्यार्थी आणि पोलीस यांच्याशी संवाद वाढविण्याची गरज आहे. बीएचयूचे मुख्य प्रॉक्टर ओ. पी. राय यांनी सांगितले की, नव्या पिढीतील तरुणांना खरडपट्टी अथवा छडीच्या माराची सवय नाही. त्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना हाताळणे ही समस्या बनली आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये सीएए-विरोधी निदर्शनांच्या वेळी जमियामध्ये दोन वेळा पोलीस कारवाई झाली होती. यात पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला होता. जेएनयूचे चीफ प्रॉक्टर धनंजयसिंग यांनी सांगितले की, जेएनयू कॅम्पस राजकीय अजेंडा रेटण्यासाठीचे साधन बनले आहे. त्यातून निर्माण होणारी स्थिती हाताळण्यास आम्ही असमर्थ आहोत. त्यामुळे पोलिसांना बोलावणे भागच पडते. पोलीस आणि विद्यार्थी यांच्याशी अधिकाधिक संवाद निर्माण करून या समस्येवर तोडगा काढायला हवा.