‘बिल्किस’प्रकरणी दोषी सुटले, गुजरातच्या माफी योजनेचा ११ जणांना लाभ; आधी झाली होती जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 09:01 AM2022-08-17T09:01:17+5:302022-08-17T09:05:07+5:30
Gujarat's Bilkis Bano Case : या दोषींपैकी राधेश्याम शाह याने १४ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने याबाबत गुजरात सरकारला निर्णय घेण्याची सूचना केली हाेती.
पंचमहल (गोधरा) : २००२ च्या गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार व त्यांच्या कुटुंबातील सात जणांच्या हत्येतील सर्व ११ दोषी मंगळवारी तुरुंगातून सुटले. विशेष सीबीआय न्यायालयाने २००४ मध्ये त्यांना जन्मठेप ठोठावली होती. राज्याच्या माफी योजनेंतर्गत स्वातंत्र्यदिनी त्यांची सुटका झाली.
या दोषींपैकी राधेश्याम शाह याने १४ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने याबाबत गुजरात सरकारला निर्णय घेण्याची सूचना केली हाेती. गोधरा प्रकरणानंतर गुजरातेत २००२ मधील दंगलीदरम्यान लिमखेडा तालुक्यात बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती.
यादरम्यान त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाचा तपास केला होता. सीबीआयने २००४ मध्ये ११ आरोपींना अटक करून मुंबईला आणले होते. सीबीआय न्यायालयाने त्यांना जन्मठेप ठोठावली होती.
आरोपींना आधी मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात आणि त्यानंतर नाशिक येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. माफी एमआयएमचे नेते खासदार असद्दुद्दीन ओवैसी यांनीही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. बानो यांच्या पतीने यावर प्रतिक्रियेस नकार दिला आहे. (वृत्तसंस्था)