गल्लीपासून दिल्लीपर्यंत लुटणारा भाजप दूर करा- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:24 AM2021-10-18T08:24:43+5:302021-10-18T08:26:28+5:30
‘दिल्लीपासून गल्ली’पर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. या लूट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
पिंपरी (पुणे) : इंधनाच्या किमती दररोज वाढत असून, महागाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकरी, कामगारविरोधी धोरण आखणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपरूपी संकटातून मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. ‘दिल्लीपासून गल्ली’पर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. या लूट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
रहाटणी काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, केंद्राचे सरकार हे महागाईचे सरकार आहे. कामगार हितविरोधी सरकार आहे. नोकरीची शाश्वती राहिली नाही. जीएसटीचे ३० हजार कोटी केंद्राकडे पडून आहेत. राज्य सरकारला कोणतीही मदत करण्याची भूमिका दिसत नाही. राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे.’
‘केंद्राकडून सत्तेचा गैरवापर होतो हे सांगा’
आता सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून ते काहीही गोष्टी करू शकतील. मात्र, हे फार काळ चालणार नाही. ते न चालण्याची परिस्थिती जनमानसात निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. केंद्राकडून सत्तेचा दुरुपयोग कसा होतोय हे घराघरांत सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत व्हायला हवे. भाजपरूपी संकटातून देशाची मुक्तता करायची आहे, असेही पवार म्हणाले.