Corona Vaccination : 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घ्यावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 05:43 PM2021-04-06T17:43:57+5:302021-04-06T17:45:25+5:30
Corona Vaccination : केंद्र सरकारने 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगितले आहे. कार्मिक मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, लसीकरणानंतरही कोव्हिड -19 पासून वाचण्यासाठी मार्गदर्शक सूचना पाळण्याची सूचना कर्मचार्यांना देण्यात आली आहे, ज्यात वारंवार हात धुणे, स्वच्छता, मास्क किंवा फेस कव्हर घालणे आणि सामाजिक अंतर इत्यादींचा समावेश आहे. (centre ask central govt employees of 45 years and above for corona vaccination)
आदेशात म्हटले आहे की, कोव्हिड -19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लसीकरणासाठी समूहांना प्राधान्य देण्याच्या धोरणावर आधारित 45 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्ती लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग घेऊ शकतात. केंद्र सरकारच्या सर्व विभाग आणि मंत्रालयांना दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, “वरील बाबी लक्षात घेता 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण करण्याचे सूचविले आहे." दरम्यान, देशात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या चिंताजनक परिस्थितीत हा आदेश आला आहे.
दरम्यान, कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
गेल्या 24 तासांत तब्बल 96,982 नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 96,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 446 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,26,86,049 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत.