आठवड्यात 4 दिवसच करा काम; तीन दिवस सुट्ट्यांचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 03:28 AM2021-02-10T03:28:34+5:302021-02-10T03:28:52+5:30
कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू
नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायद्यांची लवकर अंमलबजावणी होणार आहे. ते लागू झाल्यास नोकरदारांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा पर्याय मिळणार आहे. या कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. परंतु यासाठी कामगारांच्या कामाचे दिवसाला १२ तास असतील. त्यासाठी कंपनी आणि कर्मचारी दोघांचीही सहमती आवश्यक असेल.
केंद्रीय कामगार मंत्रालय नव्या मसुद्यावर काम करत आहे. केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले, की कामाची बदलणारी पद्धत पाहून कामांच्या वेळांमध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. काही सवलती देण्याचा प्रयत्न आहे.
कंपनी-कामगारांची सहमती हवी
नव्या कायद्यांनुसार कंपन्यांना कामाच्या दिवसांबाबत लवचिकता मिळेल. आठवड्यात एकूण ४८ तास काम करावे लागते. त्यानुसार दररोज १२ तास काम केल्यास आठवड्यात ४ दिवस कामाचे असून शकतात. मात्र, त्यासाठी कंपनी आणि कामगार यांच्यात सहमती हवी. नवा नियम कोणावर लादता येणार नाही.
असंघटित क्षेत्रासाठी स्वतंत्र संकेतस्थळ
श्रम मंत्रालयातर्फे स्वतंत्र इंटरनेट संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. असंघटित क्षेत्रासाठी हे संकेतस्थळ असून यावर्षी जून महिन्यापर्यंत कामगार त्यावर नोंदणी करु शकतील. नोंदणी करणऱ्यांना विविध सुविधांचा लाभ मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या संकेतस्थळाचा उल्लेख केला हाेता.
सक्ती करता येणार नाही
नव्या कायद्यानुसार ४ दिवस काम करून ३ दिवसांची सुट्टी घेता येईल. असे करणे सक्तीचे नसेल. या पर्यायावर कंपनी आणि कर्मचारी निर्णय घेऊ शकतात. बहुतांश राज्यांनी त्यांची नियमावली तयार केली आहे. अंतिम मसुदा लवकरच तयार होईल, असे चंद्रा म्हणाले. याबाबतच्या शंका चर्चेतून साडविण्यात आल्या आहेत, असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले.
१ एप्रिलपासून नवे कायदे
नवे कायदे १ एप्रिलपासून लागू करण्याची सरकारची याेजना आहे. त्यात वेतन कायदा, औद्याेगिक निगडित कायदा, सुरक्षा, आराेग्य व सामाजिक सुरक्षा कायद्यांचा समावेश आहे.
नव्या कायद्यांमध्ये कामगार राज्य विमा महामंडळातर्फे कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचीही तरतूद केली आहे. कंपन्यांवर त्याचा भार पडणार नाही. सर्व घटकांचा विचार करुनच अंतिम वर्कर्स काेड लागू करण्यात येतील, असे चंद्र यांनी सांगितले.