CoronaVirus: 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार; १५ पासून देशात काय काय बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 10:37 AM2020-04-08T10:37:29+5:302020-04-08T10:37:47+5:30
CoronaVirus: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ तारखेला संपणार
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे १५ एप्रिलपासून नेमकं काय होणार, लॉकडाऊनमुळे लादण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार का, लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार की टप्प्याटप्प्यानं निर्बंध मागे घेतले जाणार, असे अनेक प्रश्न सध्या देशवासीयांना पडले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपत आल्यानं केंद्र आणि राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून काय करायचं, याची तयारी सुरू केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन हटवला गेल्यास काही निर्बंध लागू असतील. म्हणजेच लॉकडाऊन काही अंशीच हटवण्यात येईल आणि नागरिकांना काही नियमांचं पालन करावं लागेल. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका मंत्रिगटाच्या बैठकीत काल याबद्दल चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. वाहनांसाठी सम-विषम फॉर्म्युला, सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांची मर्यादित संख्या असे मुद्दे बैठकीत चर्चिले गेले. १५ मेपर्यंत मॉल आणि शाळा बंद ठेवण्याची शिफारसदेखील मंत्रिगटानं केली. धार्मिक स्थळंदेखील काही दिवस बंद ठेवण्यावरही चर्चा झाली.
१४ एप्रिलनंतर काही भागातल्या नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी मिळू शकते. मात्र काही नियम-अटी लागू असतील. रस्त्यांवरील वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरण्यात आला होता. याशिवाय कारमधून एकावेळी किती जण प्रवास करू शकतात, याची मर्यादादेखील निश्चित केली जाऊ शकते.
लॉकडाऊननंतर राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या. १४ एप्रिलनंतरदेखील आंतरराज्यीय सीमा बंदच राहण्याची शक्यता अधिक आहे. ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सुरू होण्याची शक्यतादेखील कमी आहे. सध्या केमिस्टसह किराणा मालाची दुकानं सुरू आहेत. १५ एप्रिलपासून आणखी काही दुकानं उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यासंदर्भातील नियम कोरोना हॉटस्पॉट आणि इतर भागांसाठी वेगवेगळे असतील.