एअर इंडियाला केंद्राकडून 33.69 कोटी येणे; PMOने थकवले ७.१९ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 07:43 AM2021-10-23T07:43:42+5:302021-10-23T07:45:02+5:30
माहिती अधिकार अर्जाच्या प्रतिसादात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैपर्यंत केंद्र सरकारकडे एअर इंडियाची एकूण थकबाकी ३३.६९ कोटी इतकी आहे.
मुंबई : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिलेल्या विमानसेवेपोटी केंद्र सरकारकडून एअर इंडियाला अद्याप ३३.६९ कोटींचे येणे बाकी असल्याची बाब समोर आली आहे.
माहिती अधिकार अर्जाच्या प्रतिसादात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैपर्यंत केंद्र सरकारकडे एअर इंडियाची एकूण थकबाकी ३३.६९ कोटी इतकी आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या विमानसेवेचा खर्च ७.१९, राष्ट्रपतींच्या उड्डाणांची रक्कम ६.१२ कोटी आणि उपराष्ट्रपतींच्या उड्डाणांची थकबाकी १०.२१ कोटी रुपये आहे. निवृत्त कमोडोर लोकेश बत्रा यांनी उपरोक्त माहिती ‘आरटीआय’अंतर्गत मागविली.
राष्ट्रपतींची उड्डाणे संरक्षण मंत्रालय हाताळते. ५ ते ८ नोव्हेंबर २००८ दरम्यानच्य प्रवासासाठी राष्ट्रपती कार्यालयाकडून विमानसेवा वापरल्यानंतर ४.४५ कोटी रुपये थकीत राहिले. त्यावेळी प्रतिभा पाटील या पदावर होत्या.
पंतप्रधान कार्यालयाची ४.२५ कोटी थकबाकी
पंतप्रधान कार्यालयातील कॅबिनेट सचिव पंतप्रधानांच्या विमान प्रवासाची जबाबदारी सांभाळतात. ११ मार्च २०२० ते १५ मार्च २०२० दरम्यानच्या प्रवासासाठी एअर इंडियाची सेवा वापरण्यात आली. त्याची थकबाकी ४.२५ कोटी रुपये होती. ही एकल प्रवासातील सर्वाधिक थकीत रक्कम आहे.
उपराष्ट्रपती, परदेशी मान्यवर, निर्वासितांसाठी आवश्यक असलेली विमानसेवा परराष्ट्र मंत्रालय उपलब्ध करून देते. १४ ते २० ऑक्टोबर २०१६ दरम्यान उपराष्ट्रपती कार्यालयाकडून सर्वात मोठी थकबाकीची रक्कम ५.९५ कोटी रुपये होती. त्यावेळी हमीद अन्सारी या पदावर होते. निर्वासित आणि परदेशी मान्यवरांसाठी आरक्षित केलेल्या विमानसेवेपोटी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून एअर इंडियाला अनुक्रमे ७.२१ कोटी आणि २.९४ कोटी रुपये येणे आहे.