India China Faceoff: मोदी सरकार चीनला मोठा धक्का देणार?; ११७२ वस्तूंची नवी यादी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:07 PM2020-06-24T12:07:12+5:302020-06-24T12:10:52+5:30
गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांवरील हल्ल्यानंतर चीनविरोधात संतापाची लाट
नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात लडाखच्या गलवानमध्ये झालेल्या हिंसक झटापटामुळे भारत आणि चीनमधील संबंध विकोपाला गेले आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट असून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं 'मेड इन चायना' वस्तूंची यादी तयार केली आहे.
अतिशय स्वस्त वस्तूंची यादी पूर्ण झाल्यानंतर आता मोदी सरकारनं चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंची यादी तयार केली आहे. यामध्ये बॅटरी, मोटारींचे सुटे भाग, इलेक्ट्रिक यंत्रसामग्रीसह औद्योगिक यंत्रांचा समावेश आहे. मोदी सरकारनं तयार केलेल्या यादीचा फटका चीनमधून होणाऱ्या टोस्टर्ससारख्या उपकरणांच्या आयातीला बसणार आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं (डीपीआयआयटी) तयार केलेल्या दुसऱ्या यादीत चीनमधून आयात होणाऱ्या १,१७२ वस्तूंचा समावेश असल्याचं वृत्त सीएनबीसी-टीव्ही १८नं दिलं आहे.
डीपीआयआयटीनं तयार केलेल्या यादीत टोस्टर्स, फ्रीज, एसी, कॉफी मेकर्स, मायक्रोव्हेव ओव्हन, शेवर्स, कटलरी, शिलाई मशीनचा समावेश आहे. याशिवाय अनेक इलेक्ट्रिक उपकरणांवर अधिकचा आयात कर लावण्याचा डीपीआयआयटीचा विचार आहे. यामध्ये सर्किट ब्रेकर्स, उच्च क्षमतेचे स्विच, रेसिस्टर्स, जनरेटर्स आणि डीसी मोटर्सचा समावेश आहे. या यादीमध्ये इलिव्हेटर्स, रोलर बेअरिंग्ज, व्हॉल्व्स, खाद्य प्रक्रिया करणारी यंत्रं आणि कोळसा हाताळणाऱ्या यंत्रांचा समावेश आहे.
१५ जूनच्या रात्री लडाखमधील गलवान भागात भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले. त्यावेळी हिंसक झटापट झाली. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली आहे. चीनमधून होणारी आयात थांबवण्यात यावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. चीनमधून दरवर्षी ७४ बिलीयन अमेरिकन डॉलरचं सामान भारतात येतं.