Corona Vaccination: देशात कोरोना लसींचा तुटवडा; मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:33 AM2021-06-04T06:33:07+5:302021-06-04T06:34:08+5:30
केंद्राचा निर्णय : दुसरी ‘मेड इन इंडिया’ लस; बुक केले ३० कोटी डोस
नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीनंतर भारतास हैदराबाद येथील ‘बायलॉजिकल-ई’ कंपनीची दुसरी ‘मेड इन इंडिया’ लस उपलब्ध होणार आहे. सध्या चाचण्या सुरू असलेल्या या लसीचे ३० कोटी डोस केंद्र सरकारने बुक केले असून, त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून १,५०० कोटी रुपयांचा ॲडव्हॉन्स दिला जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, बायलॉजिकल - ईकडून ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान लसीचे उत्पादन व साठवणूक केली जाणार आहे. काही महिन्यांत ही लस उपलब्ध होईल. बायलॉजिकल - ईची लस सध्या वैद्यकीय चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग चाचण्यांत सहभागी असून, कंपनीला १०० कोटी रुपयांचे अर्थसाह्य सरकारकडून करण्यात आले आहे. सुत्रांनी सांगितले की, बायलॉजिकल - ईने जॉन्सन अँड जॉन्सच्या कोविड लसीचे वार्षिक ६०० दशलक्ष डोस उत्पादित करण्याचा स्वतंत्र करारही केलेला आहे.
सीरम करणार ‘स्पुतनिक-व्ही’चे उत्पादन
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीचे उत्पादन करण्याच्या परवानगीसाठी भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) अर्ज केला आहे. भारतात ही लस सध्या डॉ. रेड्डीज लॅबोरॅटरीजकडून उत्पादित केली जात आहे.
दरम्यान, कोविशिल्ड लसीचे १० कोटी डोस आपण जूनमध्ये पुरवू शकू, असे ‘सीरम’ने केंद्र सरकारला कळविले आहे. कंपनीकडून नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादनही केले जात असून, या लसीची अमेरिकेच्या औषधी नियंत्रकांची परवानगी प्रतीक्षेत आहे. देशातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी सरकारकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच सरकार विविध कंपन्याकडून लस खरेदी करीत आहे.