शेतमालासाठी एका फोनवर मिळेल ट्रक; केंद्राच्या ‘कृषी रथ अॅप’ने शेतकऱ्यांची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:41 AM2020-04-20T01:41:04+5:302020-04-20T01:41:29+5:30
शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी ट्रक बुक करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘कृषी रथ’ नावाचे नवे मोबाईल अॅप सुरु केले
नवी दिल्ली : प्रवासासाठी टॅक्सी बुक करण्याच्या उबर किंवा ओला अॅपच्या धर्तीवर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी ट्रक बुक करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘कृषी रथ’ नावाचे नवे मोबाईल अॅप सुरु केले आहे. या अॅपचा उपयोग करून शेतकरी त्याच्या मोबाईल फोनवरून घरबसल्या ट्रक बुक करू शकेल व हा ट्रक त्याच्या दारात येऊन त्याचा शेतमाल बाजारात घेऊन जाईल.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काही दिवसांपूर्वी या ‘कृषी रथ अॅप’चा औपचारिक शुभारंभ केला. खास करून सध्याच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात रब्बी हंगामात तयार झालेला शेतमाल घाऊक व्यापारी किंवा बाजार समित्यांपर्यंत घेऊन जाण्यास यामुळे शेतकºयांची खूूप सोय होईल. हे अॅप गुगल अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल.
या अॅपच्या सेवेसाठी सध्या ५.२ लाख ट्रक व २० हजार ट्रॅक्टरची नोदणी झालेली आहे. अॅप डाऊनलोड केल्यावर शेतकºयाला त्यात आपल्याला किती वजनाचा माल कुठून कुठे पाठवायचा आहे याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर त्याला त्या भागात उपलब्ध असलेला ट्रक व त्याचे अपेक्षित भाडे याची माहिती कळविली जाईल.
वाटाघाटी करून भाडे ठरले की ट्रक बूक होईल. ट्रकचे भाडे बूकिंग करताना किंवा मालाची वाहतूक झाल्यावर दिले जाऊ शकेल.
यामुळे एकाच रस्त्याने एकाच दिशेने जाणारा ट्रक अनेक शेतकºयांचा माल घेऊन जाऊ शकेल. याने शेतकरी व वाहतूकदार या दोघांचाही फायदा होईल. शेतकºयाला पूर्ण ट्रकचे भाडे देण्याऐवजी मालाचे जेवढे वजन असेल तेवढेच भाडे द्यावे लागेल. वाहतूकदारालाही पूर्ण क्षमतेने माल भरून वाहतूक करणे किफायतशीर ठरेल.
डाळी, तेलबियांची खरेदी
‘लॉकडाऊन’ असूनही ‘नाफेड’व भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) या केंद्र सरकारच्या संस्थांनी रब्बी हंगामातील डाळी, कडधान्ये व तेलबियांची हमी भावाने जोरदार खरेदी सुरु ठेवली आहे.
कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १६ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह सात राज्यांत एक लाख १४ हजार ३३८ शेतकºयांकडून १.३३ लाख टन डाळी व २९,२६४ टन तेलबियांची थेट खरेदी केली.
या खरेदीचे एकूण मूल्य ७८४ कोटी रुपये आहे. या खेरीज महाराष्ट्रासह चार राज्यांत ‘प्राईस स्टॅबिलायजेशन फंड’ योजनेखाली ५.३२ लाख टन तुरीचीही खरेदी थेट शेतकºयांकडून केली गेली.