फेब्रुवारीपासून कोरोनाची साथ उतरणीला लागणार, लस विकसित झाल्यास मिळेल दिलासा; केंद्राच्या समितीचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 01:32 AM2020-10-19T01:32:06+5:302020-10-19T07:02:01+5:30
हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक एम. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. या समितीने म्हटले आहे की, फेब्रुवारीत ही साथ उतरणीला लागली तरी काळजी न घेतल्यास तोवर रुग्णांची एकूण संख्या १.६ कोटीपर्यंत पोहोचू शकते. (CoronaVirus)
नवी दिल्ली : देशात कोरोना साथीने आता कळस गाठला असून ती पुढील वर्षी फेब्रुवारीपासून उतरणीला लागण्याची शक्यता आहे, असे केंद्राने या साथीसंदर्भात नेमलेल्या शास्त्रज्ञांच्या समितीने म्हटले आहे. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे.
हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक एम. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. या समितीने म्हटले आहे की, फेब्रुवारीत ही साथ उतरणीला लागली तरी काळजी न घेतल्यास तोवर रुग्णांची एकूण संख्या १.६ कोटीपर्यंत पोहोचू शकते. नियमांचे नीट पालन न केल्यास सणासुदीच्या दिवसांत रुग्ण संख्या आणखी २६ लाखांनी वाढण्याचा धोका आहे, असे समितीने म्हटले आहे. सध्या नवरात्र सुरू होऊन, त्यानंतर दसरा, दिवाळी, क्रिसमस हे उत्सव आहेत. या काळात सर्वांनी फिजिकल डिस्टन्स पाळत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावाच लागेल, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
हिवाळ्यात दुसऱ्या लाटेची शक्यता -
देशात मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर केला नसता, तर या आजाराने आतापर्यंत २५ लाख बळी घेतले असते, असे समितीने म्हटले आहे. हिवाळ्यामध्ये कोरोना साथीची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व कोरोना साथीसंदभार्तील शास्त्रज्ञांच्या समितीचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनीही नमूद केले.
त्वचेवर विषाणू राहतो नऊ तास -
कोरोनाचा विषाणू मानवी त्वचेवर सुमारे नऊ तास जिवंत राहतो, असा निष्कर्ष जपानी शास्त्रज्ञांनी प्रयोगाअंती काढला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सतत हात धुवायला हवेत, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या संशोधनावरील एक लेख क्लिनिकल इन्फेक्शिअस डिसिजेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.