बॉलिवूडमधील एका गटाला पंतप्रधानपदी मोदी नकोसे - मधुर भांडारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:12 IST2018-06-18T17:12:54+5:302018-06-18T17:12:54+5:30
त्याला विरोध करण्यासाठी अनुपम खेर यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरा गट निर्माण झाला.

बॉलिवूडमधील एका गटाला पंतप्रधानपदी मोदी नकोसे - मधुर भांडारकर
नवी दिल्ली: पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींची झालेली निवड ही बॉलीवूडमधील एका गटाला रुचलेली नसल्याचा गौप्यस्फोट प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केला. छत्तीसढच्या भिलाई येथील कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी म्हटले की, बॉलिवूडमधील अनेकांच्या मनात मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्याची सल अजूनही आले. या गटात अभिनेते, दिग्दर्शक आणि अनेक निर्मात्यांचा समावेश आहे. त्यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी बॉलिवूडमध्ये दोन तट पडले होते. बॉलिवूडमधील जवळपास 40 ते 50 जण नरेंद्र मोदींविरोधात एकटवले होते. मोदी पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रयत्नही केल्याचे मधुर भांडारकर यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी या लोकांकडून मोदींविरोधात पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु होते. तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी अनुपम खेर यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरा गट निर्माण झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मोठ्याप्रमाणावर राजकारण करतात. याच लोकांकडून 'इंदू सरकार' चित्रपटाच्यावेळी माझ्यावर आरोप करण्यात आले होते. इंदू सरकारच्या निर्मितीसाठी केवळ सहा कोटी रूपये खर्च आला. अशावेळी भाजपाने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत पुरविली होती, हा आरोप खूपच हास्यास्पद आहे. भविष्यात मला एखाद्या बिग बजेट चित्रपटासाठी मदत लागलीच तर मी नक्कीच भाजपाकडे जाईन, असा टोलाही यावेळी मधुर भांडारकर यांनी विरोधकांना लगावला.