बीसीए, बीएमएस, बीबीएसाठी पुढच्या वर्षापासून सीईटी? स्वतंत्रपणे तयारी करावी लागणार!
By रेश्मा शिवडेकर | Published: January 10, 2024 05:49 AM2024-01-10T05:49:34+5:302024-01-10T05:51:00+5:30
नुकताच व्यावसायिक म्हणून दर्जा मिळालेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CET
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीसीए, बीएमएस, बीबीए या पारंपरिक महाविद्यालयांमध्ये चालविल्या जाणाऱ्या आणि नुकताच व्यावसायिक म्हणून दर्जा मिळालेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लवकरच ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) द्यावी लागणार आहे.
‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) केलेल्या सूचनेनुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून या संदर्भात राज्याच्या सीईटी सेलकडे विचारणा करण्यात येणार आहे. तसेच, या अभ्यासक्रमांच्या शुल्क निश्चितीसाठीही शुल्क नियमन प्राधिकरणाकडे (एफआरए) प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सीईटी सेलने मान्यता दिल्यास २०२५ पासून बीसीए, बीएमएस, बीबीएचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातून घेतले जातील, अशी माहिती विभागातील सूत्रांनी दिली.
या अभ्यासक्रमांचे प्रवेश केवळ बारावीच्या गुणांआधारे होतात, तर शुल्क विद्यापीठ मंजूर करते; परंतु यूजीसीने ८ जानेवारीला पत्र लिहून या अभ्यासक्रमांचे ‘एआयसीटीई’ कायद्यानुसार नियमन करावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाला आणि कुलगुरूंना दिल्या आहेत. या अभ्यासक्रमांना एआयसीटीईची मार्गदर्शक तत्त्वे लागू राहतील, असे यूजीसीने पत्रात नमूद केले आहे. यानुसार पुढील कारवाई करावी लागणार आहे, असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आतापर्यंत संलग्नित विद्यापीठांकडून बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) या अभ्यासक्रमांचे नियमन करण्यात येत होते. मात्र ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’ (एआयसीटीई) या केंद्रीय नियमन संस्थेने या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा देत नोव्हेंबर, २०२३ मध्ये आपल्या कक्षेत घेतले.
त्यामुळे या अभ्यासक्रमांचे नियमन एआयसीटीईला इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातून आणि शुल्क ‘फी रेग्युलेशन अथॉरिटी’च्या (एफआरए) माध्यमातून निश्चित होणे आवश्यक आहे.
स्वतंत्रपणे तयारी करावी लागणार!
सीईटीकरिता विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे तयारी करावी लागणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयात सीईटीची तयारी करून घेतली जात नाही. त्यामुळे येत्या काळात या सीईटीसाठी क्लासेसचे पेव फुटणार आहे.
७३ हजार प्रवेश
हे तीन अभ्यासक्रम खूप लोकप्रिय असून विनाअनुदानित तत्त्वावर चालविले जातात. २०२१ साली राज्यभरातून तब्बल ७३ हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. त्यात मुंबईतील १४,३६३ आणि पुण्यातील १५,८०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.