विद्यार्थी संघाच्या अध्यक्षाचे पदवी प्रमाणपत्र बोगस?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 04:31 AM2018-09-21T04:31:26+5:302018-09-21T04:31:37+5:30
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आलेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता अंकीव बैसोया याच्या तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर विद्यापीठाच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आलेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता अंकीव बैसोया याच्या तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर विद्यापीठाच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. तिथे पदवी घेऊ न त्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, त्याचे तिरुवेल्लूर विद्यापीठाचे सादर केलेले पदवी प्रमाणपत्र बोगस आहे, असे कुलसचिवांचे पत्र काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडियाने (एनएसयूआय) उघड केले आहे.
हे पत्र बोगस आहे, असा अंकीव बैसोया याचा दावा आहे. मात्र, आपण त्याच्यावरील आरोपांची चौकशी करीत आहोत, त्यासाठी तिरुवेल्लूर विद्यापीठाशी संपर्क साधणार आहोत, असे अभाविपने जाहीर केले
आहे.
दिल्ली विद्यापीठात अलीकडेच झालेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकांत अभाविपने बाजी मारली होती. त्या निवडणुकीत अभाविपने गैरप्रकार केल्याचा आरोप एनएसयूआयने केला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.