सेक्सटाॅर्शन, फ्राॅड काॅल्सपासून तुमचे रक्षण करणार ‘चक्षू’; सरकारने लाॅंच केली नवी यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:55 PM2024-03-06T13:55:41+5:302024-03-06T14:01:49+5:30
केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ‘डिजिटल इंटेलिजन्स’ आणि ‘चक्षू’ असे दाेन प्लॅटफाॅर्म लाॅंच केले. संचार सारथीच्या पाेर्टलवर ‘चक्षू’ची लिंक आहे. तिथे लाॅगिन केल्यानंतर तक्रार दाखल करता येईल.
नवी दिल्ली : देशात दरराेज हजाराे लाेकांची लाखाे रुपयांनी सायबर भामटे फसवणूक करतात. बनावट काॅल, सेक्सटाॅर्शन, एसएमएस किंवा व्हाॅट्सॲप, टेलिग्राम यासारख्या ॲप्सवरुन जाळे टाकले जाते. अशा गुन्हेगारांना झटका देण्याची तयारी सरकारने केली आहे. स्पॅम आणि फ्राॅड काॅल्सची माहिती देण्यासाठी एक नवी यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेला ‘चक्षू’ असे नाव दिले आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ‘डिजिटल इंटेलिजन्स’ आणि ‘चक्षू’ असे दाेन प्लॅटफाॅर्म लाॅंच केले. संचार सारथीच्या पाेर्टलवर ‘चक्षू’ची लिंक आहे. तिथे लाॅगिन केल्यानंतर तक्रार दाखल करता येईल.
अशी हाेईल कारवाई -
- चक्षूवरुन प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे तपास करण्यात येईल. गुन्ह्याशी संबंधित लाेकांना पकडण्यात येईल.
- स्पॅम काॅल करणारे व इतर संशयास्पद क्रमांक बंद केले जातील. यामुळे सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळेल.
डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफाॅर्म -
यामाध्यमातून बॅंका, साेशल मीडिया तसेच इतर संस्थांना सायबर गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान करता येते. फसवणूक झाल्यास याद्वारे तत्काळ माहिती देता येते. रिअल टाईम माहितीचे आदानप्रदान झाल्यामुळे फसवणूक राेखता येईल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
५९लाख क्रमांक आतापर्यंत संचार सारथी पाेर्टलवर केलेल्या तक्रारीनंतर बंद करण्यात आले आहेत.
१०लाखांपेक्षा जास्त बॅंक खाती आणि पेमेंट वाॅलेट गाेठविण्यात आले आहेत.
१,००० काेट रुपयांपर्यंतची रक्कम फसवणुकीपासून वाचविण्यात आली आहे.
या आहेत श्रेणी -
सेक्सटाॅर्शनचे काॅल किंवा मेसेज, सरकारी अधिकारी किंवा त्यांचे नातेवाई असल्याचे भासवून काॅल करणे, बनावट काॅल सेंटरचे काॅल्स.
बॅंक, विज, गॅस, विमा इत्यादींसाठी सतत येणारे काॅल्स.
राेबाेटिक किंवा सतत करण्यात येणारे काॅल्स.
ऑनलाईन नाेकरी, लाॅटरी, भेट, लाेन ऑफर इत्यादींसाठी येणारे बनावट काॅल्स.
संशयास्पद वेबसाईटची लिंक असलेले मेसेजेस.
इतर संशयास्पद फ्राॅड.
‘चक्षू’कडे करा तक्रार
फ्राॅड, स्पॅम किंवा सेक्सटाॅर्शन यासारख्या काॅल्सची तक्रार ‘चक्षू’च्या माध्यमातून करता येईल. नागरिकांना आलेले काॅल किंवा मेसेजेसचे स्क्रीनशाॅट अपलाेड करता येतील. संबंधित काॅल किंवा मेसेजची तारीख, वेळ व इतर माहिती द्यावी लागेल.