डान्सबार बंदीला बारबालांचे आव्हान
By admin | Published: March 3, 2017 04:44 AM2017-03-03T04:44:48+5:302017-03-03T04:44:48+5:30
डान्सबार मालकांच्या पाठोपाठ आता या बारमध्ये नृत्य करणाऱ्या बारबालांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
नवी दिल्ली : डान्सबार चालविण्यासाठी अत्यंत कडक अटींवर परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्यास डान्सबार मालकांच्या पाठोपाठ आता या बारमध्ये नृत्य करणाऱ्या बारबालांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
‘भारतीय बारगर्ल्स युनियन’ या बारबालांच्या संघटनेने केलेली याचिका गुरुवारी न्या.दीपक मिश्रा व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आली असता महाराष्ट्र सरकारला नोटिस काढून चार आठवड्यात उत्तर देण्याचे निदेश दिले गेले.
याआधी ‘इंडियन हॉटेल
अॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन’ने केलेली याचिकाही प्रलंबित आहे. आता या दोन्ही याचिका येत्या २० एप्रिल रोजी एकत्रितपणे सुनावणीसाठी येतील. हॉटेल मालकांच्या याचिकेवर न्यायालयाने नव्या कायद्याला अंतरिम स्थगिती दिली नसली तरी त्यातील काही तरतुदींना जोरदार हरकत घेतली आहे. तसेच काही डान्सबारना जुन्या कायद्यातील अटींनुसार परवाने देण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)