"मुदतीत चौकशी पूर्ण करणे आव्हानच"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:08 AM2018-10-27T04:08:56+5:302018-10-27T04:09:26+5:30
आलोक वर्मा प्रकरणाची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिले असले तरी या मुदतीत चौकशी पूर्ण करणे पटनाईक आणि केंद्रीय दक्षता आयोगासाठी महाकठीणच आहे, असे उच्चपदस्थांनी सांगितले.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनाईक यांच्या देखरेखीखाली दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिले असले तरी या मुदतीत चौकशी पूर्ण करणे पटनाईक आणि केंद्रीय दक्षता आयोगासाठी महाकठीणच आहे, असे उच्चपदस्थांनी सांगितले.
सीव्हीसी आणि सीबीआयचे अधिकारी २९ आॅक्टोबरपासून दक्षता आयोग सप्ताहनिमित्त व्यग्र असतील. राष्टÑपती राम नाथ कोविंद ३१ आॅक्टोबरला दक्षता अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दक्षता सप्ताहाचा समारोप ३ नोव्हेंबर रोजी होणार असून ४ नोव्हेंबर रोजी रविवार येतो. तसेच ६ ते ७ नोव्हेंबर दिवाळी असल्याने दोन आठवड्यांत चौकशी पूर्ण करणे अशक्यप्राय असल्याचे आयोगातील अधिकाºयाने सांगितले.
न्या. ए. के. पटनाईक यांना जलदगतीने चौकशीसाठी स्वतंत्र कार्यालय, मनुष्यबळ लागेल. न्या. पटनायक अत्यंत व्यावहारिक आणि कणखर बाण्याचेआहेत. ते दक्षिण दिल्लीतील एका छोट्या खासगी फ्लॅटमध्ये राहतात. त्यांचे पुत्रही सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात.
सीबीआयचे अधिकारमुक्त संचालक वर्मा यांच्या प्रकरणाची चौकशीसाठी देण्यात आलेली मुदत निश्चितच मर्यादित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांनी २४ आॅगस्ट रोजी सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी दिलेल्या पत्रात वर्मा यांच्यावर पुराव्यासह भ्रष्टाचाराचे आरोप केले.
>वादळ शांत करण्यासाठी मागितला जाईल वेळ
न्या. पटनाईक यांना सर्व पुराव्यांची शहानिशा करावी लागणार आहे. वर्मा यांची बाजूही ऐकून घ्यावी लागेल. प्रसंगी राकेश अस्थाना यांनाही बोलावले जाईल. त्यामुळे सीव्हीसी आणि सरकारकडून चौकशी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सीबीआयवरून उठलेले वादळ शांत करण्यासाठी कदाचित वेळही मागितला जाईल, असे अनेकांना वाटते.