निवडणूक अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान
By Admin | Published: April 13, 2015 11:53 PM2015-04-13T23:53:08+5:302015-04-13T23:53:08+5:30
निवडणूक अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान
न वडणूक अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हानऔरंगाबाद : धनंजय आणि पंडितअण्णा मुंडे न्यायालयातऔरंगाबाद : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल केलेला उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाला आव्हान देणार्या वेगवेगळ्या याचिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या आहेत. या प्रकरणी न्यायालयाने सोमवारी प्रतिवादी ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे यांच्यासह प्रतिवादींना नोटिसा काढून याचिकेची सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली आहे.बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार कारखान्याचे सभासद धनंजय मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. छाननीत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दोन्ही पिता-पुत्र संचालक असलेल्या जगत्मित्र सहकारी सूतगिरणीकडे जिल्हा बँकेची थकबाकी असल्याचे कारण देत त्यांचे अर्ज रद्द केले. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. मात्र, त्यांचे आक्षेप मान्य करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधकां (सहकारी संस्था)कडे अपील दाखल केले. विभागीय सहनिबंधकांनी उभयतांचे अपील फेटाळून निवडणूक निर्णय अधिकार्यांचा निर्णय कायम ठेवला. आ. मुंडे आणि पंडितअण्णा यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल केल्या. याचिकेत न्यायालयाने प्रतिवादी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, यशस्विनी मुंडे, निवडणूक निर्णय अधिकारी आदी प्रतिवादींना नोटिसा काढण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली.एफआयआर रद्द करण्याची याचिका मागेजगत्मित्र सहकारी सूतगिरणीतील कथित १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका सोमवारी याचिकाकर्ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे या संचालकांनी न्यायालयातून मागे घेतली.टोकीवाडी (ता. परळी, जि. बीड) येथील जगत्मित्र सहकारी सूतगिरणीने २००३ पासून कापूस उत्पादकांना कापसाचे पैसे देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे सूतगिरणीची मालमत्ता शिखर बँकेकडे गहाण आहे. असे असताना कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता जिल्हा बँक दरवर्षी कर्ज देत राहिली. २०१२ पर्यंत सूतगिरणीला १२ कोटी रुपये कर्ज देण्यात आले. बँकेने दिलेल्या कर्जाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी बँक मॅनेजर शेख शमीम अकबर यांनी २ ऑक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या तक्रारीवरून धनंजय मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांच्यासह १७ संचालकांविरोधात भादंवि ४२०, ४०६ आणि ३४ या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करावा, यासाठी आ. धनंजय मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांनी खंडपीठात धाव घेतली आहे. ही याचिका सोमवारी न्यायालयासमोर आली असता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या परवानगीने याचिका मागे घेतली. आ. धनंजय मुंडे यांच्याकडून ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे काम पाहत आहेत.