मतदानयंत्र हॅक करण्याचे आव्हान प्रयत्नाविना संपले
By Admin | Published: June 4, 2017 12:47 AM2017-06-04T00:47:20+5:302017-06-04T00:47:20+5:30
देशभरात निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतदानयंत्रे पूर्णपणे निर्धोक आणि विश्वासार्ह आहेत याची खात्री करून देण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरात निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतदानयंत्रे पूर्णपणे निर्धोक आणि विश्वासार्ह आहेत याची खात्री करून देण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी ‘या आणि आमची मतदानयंत्रे हॅक करून दाखवा’ हा जाहीर आव्हानात्मक कार्यक्रम आयोजित केला. परंतु हे आव्हान यंत्रे हॅक करण्याचा कोणीही प्रयत्न न करताच संपले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोन राजकीय पक्षांनी यात सहभाग घेतला. परंतु आम्हाला मतदानयंत्रे हॅक करण्यात स्वारस्य नाही. आम्ही त्यांचे काम समजावून घेऊन शंका समाधान करून घेण्यासाठी आलो आहोत, असे या पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यानुसार या प्र्रतिनिधींनी यंत्रांच्या कामाची प्रात्यक्षिके पाहून व आयोगाच्या तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आपल्या शंका व किंतू दूर झाल्याचे सांगून समाधान व्यक्त केले, असे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. निस्सिम झैदी यांनी पत्रकारांना सांगितले.
झैदी म्हणाले की, मार्क्सवादी पक्षाच्या प्रतिनिधींनी शंकासमाधान झाल्यानंतर अशी सूचना केली की, भविष्यातही अशा शंकांना जागा राहू नये यासाठी आयोगाने अशीच सक्रियता दाखवावी.
झैदी म्हणाले की,खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही आम्हाला आव्हान देण्यात नव्हे तर शंका दूर करून घेण्यात स्वारस्य आहे, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी वापरलेल्या मतदानयंत्रांमध्ये गोंधळाचे जे प्रकार झाले त्यावरून शंका निर्माण झाल्याचे या पक्ष प्रतिनिधींचे म्हणणे होते. यावर महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांसाठी वापरली गेलेली मतदानयंत्रे राष्ट्रीय आयोगाची नव्हती, असे स्पष्ट केले.
निवडणुकांचे पावित्र्य, निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवून नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढमूल करण्यासाठी आयोग शक्य ते सर्व करेल. निवडणूक प्रक्रियेवरील लोकांच्या श्रद्धेला तडा जाईल, असे आयोग काहीही घडू देणार नाही.
-डॉ. नसिम झैदी,
मुख्य निवडणूक आयुक्त