‘आयपीएल’ सामने हलविण्यास आव्हान
By admin | Published: April 23, 2016 02:58 AM2016-04-23T02:58:45+5:302016-04-23T02:58:45+5:30
आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
नवी दिल्ली : आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी (ता. २५) सुनावणी होणार आहे.
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल क्रिकेट संघटनेची बाजू मांडत आहेत. क्रिकेट सामन्यांच्या खेळपट्ट्या ( पीच) तयार करण्यासाठी पिण्याचे पाणी नव्हे तर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर केला जात आहे, असे सिब्बल यांनी खंडपीठाला सांगितले. न्या. दीपक मिश्रा आणि शिवकीर्तिसिंग यांच्या खंडपीठाने २५ एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती पाहता ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात होणारे आयपीएलचे सर्व म्हणजे १३ सामने अन्यत्र हलविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने १३ एप्रिल रोजी दिला होता. मात्र बीसीसीआयच्या विनंतीवरून १ मे रोजी आणखी एक सामना पुण्यात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे रोजीचा अंतिम सामनाही मुंबईला होणार होता.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही सर्वोच्च न्यायालयात मुंबई क्रिकेट असोसिएशनप्रमाणेच अर्ज केला आहे.