काँग्रेस आणि राहुल गांधींपुढे कर्नाटक राखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:09 AM2018-03-31T05:09:57+5:302018-03-31T05:09:57+5:30

कर्नाटकमध्ये १२ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय मिळाल्यास पंजाबनंतर हे राज्य राखल्याचे समाधान

Challenges to keep Karnataka and Rahul Gandhi behind | काँग्रेस आणि राहुल गांधींपुढे कर्नाटक राखण्याचे आव्हान

काँग्रेस आणि राहुल गांधींपुढे कर्नाटक राखण्याचे आव्हान

Next

बंगळुरू : कर्नाटकमध्ये १२ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय मिळाल्यास पंजाबनंतर हे राज्य राखल्याचे समाधान काँग्रेसला मिळू शकेल, तर उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या पराभवाची भरपाई कर्नाटकातील विजयाने करण्यासाठी भाजपाची पावले पडत आहेत.
निवडणुकांचे घोडामैदान जसजसे जवळ येऊ लागले आहे तसतसे प्रत्येक पक्ष आपल्यातील बलस्थाने व उणिवा यांचे परीक्षण करून विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या काँग्रेस, भाजपा व देवेगौडा यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची आजची स्थिती पाहणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अनेक योजनांचा जनतेला लाभ झाला आहे. सरकारविरोधी असंतोषाचे चटके त्यामुळे कमी होणार आहेत.
कानडी अस्मितेची जपणूक व राज्यासाठी स्वतंत्र ध्वज यांचाही काँग्रेसला फायदा होईल. त्यांनी अहिंदा (अल्पसंख्याक, मागास हिंदू व दलित) समीकरण राबवून पक्षाचे स्थान मजबूत केले.
लिंगायतांनाही धर्माचा दर्जा व धार्मिक अल्पसंख्य म्हणून दर्जा देण्याची शिफारस अशी यशस्वी खेळी खेळले.

लिंगायत समाजाला आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न कॉँग्रेसने चालवले असले तरी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा लिंगायत असल्याने त्यांनाही ती मते मिळतील. मात्र येडियुरप्पा काही काळ तुरुंगात होते. काँग्रेस प्रचारात हे मुद्दे लावून धरेल.

स्वत:ची प्रबळ नेता व यशस्वी नेता अशी प्रतिमा निर्माण करण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यशस्वी झाले. त्यामुळेच ते पाच वर्षे पूर्ण करू शकले. गेल्या चार दशकांत कर्नाटकात एकही मुख्यमंत्री पाच वर्षे टिकला नाही. मात्र त्यांना दुसरी टर्म मिळेल?

मोदी सरकार दलितांसाठी काही करणार नाही
दावणगिरी : येडियुरप्पा सरकार हे सर्वांत भ्रष्ट सरकार होते, असे चुकून बोलणारे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आणखी एका वक्तव्याचा चुकीचा अनुवाद केल्याने भाजपा अडचणीत आली आहे. सभेत अमित शहा हिंदीतून भाषण करीत होते आणि धारवाड येथील खा. प्रल्हाद जोशी यांनी शहा यांच्या एका वाक्याचा ‘मोदी सरकार अनुसूचित जाती व जमातींसाठी काही करणार नाही,’ असे भाषांतर केले.त्यामुळे लोकही चकित झाले. प्रत्यक्षात शहा यांनी सिद्धरामय्या सरकारविषयी हे विधान केले होते. या चुकीच्या भाषांतरामुळं भाजपाची मोठी पंचाईत झाली आहे. याआधी अमित शहा स्वत:च येडियुरप्पा यांचे सरकार सर्वांत भ्रष्ट होते, असे म्हणाले होते. त्या वेळी त्यांच्या शेजारीच बसलेले येडियुरप्पा अस्वस्थ झाले होते. मात्र काँग्रेस नेते खूश आहेत. भाजपा स्वत:च सत्य सांगत आहे, असे उद्गार काँग्रेस नेत्यांनी काढले होते. येडियुरप्पा सरकारला सर्वांत भ्रष्ट म्हटल्याबद्दल सिद्धरामय्या यांनी शहा यांचे जाहीर आभार मानले होते.

काँग्रेसमध्ये नाही समन्वय
चांगल्या व लोकप्रिय योजना राबवूनही त्या लोकांपर्यंत नेण्यासाठी राज्य सरकार व काँग्रेस संघटना यांच्यात समन्वय नाही. राज्यातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक गटतट असणे त्रासदायक आहे. एच. डी. देवेगौडा यांचा पक्ष राज्यात काही ठिकाणी काँग्रेसपुढे अडचणी निर्माण करू शकतो. हानिकारक ठरू शकतो.

मोदींच्या सभांवर भरवसा
भाजपाचा सर्वांत भरवसा आहे तो पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभांवर. ते निवडणूक जिंकून देतील, अशी भाजपाला खात्री आहे. येडियुरप्पा व ईश्वरप्पा यांच्यातील मतभेद संपविण्याचे अमित शहा यांनी केलेले प्रयत्न असफल ठरले. राज्यात काँग्रेसप्रमाणे भाजपा आतापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेली नाही. देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष)ने बसपा व डाव्यांशी आघाडी करण्याचे ठरवले आहे.

नसलेला
भाजपा कार्यकर्ता
काँग्रेसचे आमदार एन. ए. हॅरिस याने काही महिन्यांपूर्वी इका पबच्या बाहेर विद्वत लोकनाथ नावाच्या तरुणास मारहाण केली होती. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. अमित शहा यांनी विद्वत लोकनाथ हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे नमूद केल्यानेही गोंधळ झाला होता. विद्वत लोकनाथ याचा भाजपाशी काहीच संबंध नव्हता. ते लक्षात आणून दिल्यावर शहा यांना आपले विधान मागे घ्यावे लागले होते.

Web Title: Challenges to keep Karnataka and Rahul Gandhi behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.