शापूरजी आणि पालनजी मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयाला देणार आव्हान
By admin | Published: October 24, 2016 09:35 PM2016-10-24T21:35:41+5:302016-10-24T22:02:16+5:30
शापूरजी आणि पालनजी या निर्णयाविरोधात कोर्टाचा दरवाजाही ठोठावण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयावर टाटा समूहात सर्वात मोठा भागीदार असलेल्या शापूरजी आणि पालनजी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "टाटा सन्समधून सायरस मिस्त्रींना पदावरून दूर करण्याचा निर्णय हा अवैध आहे. सायरस मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय हा सर्वानुमते घेण्यात आला नाही. माजी सॉलिसिटर जनरल मोहन परासरन यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली आहे, असं शापूरजी आणि पालनजी समूहानं सांगितलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार शापूरजी आणि पालनजी या निर्णयाविरोधात कोर्टाचा दरवाजाही ठोठावण्याची शक्यता आहे. सायरस मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयावर नऊ बोर्ड सदस्यांपैकी फक्त 8 जणांनी मतदान केलं. त्यातही दोन जण तटस्थ राहिले, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सनं दिली आहे. सायरस मिस्त्री याआधी शापूरजी आणि पालनजी यांच्या समूहात व्यवस्थापकीय संचालक होते. मिस्त्री हे शापूरजी आणि पालनजी यांच्या जवळचे समजले जातात.
(सायरस मिस्त्रींना 'टाटा')
काही तासांपूर्वीच 'टाटा सन्स'ने सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून दूर केलं आहे. तूर्तास रतन टाटा यांची ४ महिन्यांसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सर्च पॅनल 4 महिन्यांत नव्या अध्यक्षाची निवड करणार आहे. चार वर्षांपूर्वी 28 डिसेंबर 2012 रोजी सायरस मिस्त्री यांची 'टाटा सन्स'च्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या सर्च पॅनलमध्ये रतन टाटा यांच्यासह वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे.