समुद्रमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आव्हान
By admin | Published: February 8, 2016 03:23 AM2016-02-08T03:23:21+5:302016-02-08T03:23:21+5:30
सागरीमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि सागरी चाचे हे भारताच्या सागरी सुरक्षेसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
विशाखापट्टणम : सागरीमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि सागरी चाचे हे भारताच्या सागरी सुरक्षेसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
दक्षिण चीन सागर विवादाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी नौकावहनाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची वकिली केली. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना मोदी म्हणाले की, ‘भारत सागरीमार्गे निर्माण होणाऱ्या धोक्याचा थेट बळी ठरत आला आहे. अशा सागरी मार्गे निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे अजूनही प्रादेशिक आणि वैश्विक शांतता आणि स्थैर्य धोक्यात आलेले आहे.’ विशाखापट्टणम येथे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूच्या समारोप समारंभात मोदी बोलत होते. दक्षिण चीन सागरातील विवादावर अप्रत्यक्ष भाष्य करताना मोदी पुढे म्हणाले की, सर्व देशांनी नौकावहनाच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे.पारादीप (ओडिशा) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांचा आराखडा तयार करणे आणि प्रकल्प वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी एका नव्या कार्य संस्कृतीची गरज आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा विलंब आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यावर जोरदार टीका केली.अलीकडच्या काळात ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले ते सर्व प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले होते, या काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपाचे मोदी यांनी खंडन केले. ‘या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आनंद होतो आहे; परंतु हा प्रकल्प १५ वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आला असता, त्यातून रोजगारनिर्मिती झाली असती तर पंतप्रधान या नात्याने मला मोठा आनंद झाला असता, असे ते म्हणाले.