Karnataka Election Results 2018- चामराजनगर सिद्धरामय्यांंना भोवले?, तेथे भेट देणाऱ्याचे मुख्यमंत्रीपद जाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:26 AM2018-05-16T04:26:28+5:302018-05-16T04:26:28+5:30
कर्नाटकमध्ये पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे देवराज अर्स. त्यानंतर, सिद्धरामय्या यांनीच पाच वर्षे पूर्ण केली, पण त्या दोघांत आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे चामराजनगरचा कथित पायगुण. चामराजनगरला भेट दिल्यानंतर दोघांचेही मुख्यमंत्रीपद गेले.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे देवराज अर्स. त्यानंतर, सिद्धरामय्या यांनीच पाच वर्षे पूर्ण केली, पण त्या दोघांत आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे चामराजनगरचा कथित पायगुण. चामराजनगरला भेट दिल्यानंतर दोघांचेही मुख्यमंत्रीपद गेले.
पाच वर्षांत सिद्धरामय्या नऊ वेळा चामराजनगरला गेले. मुख्यमंत्रीपदी पाच वर्षे राहायचे असेल, तर त्याने या शहराला भेट द्यायला हवी, असेही त्यांनी बोलून दाखविले होते, पण त्या शहराला भेट देणाºया प्रत्येक मुख्यमंत्र्याला नंतर सत्ता सोडावी लागली, हा इतिहास आहे. त्यामुळे चामराजनगरचा दौरा सिद्धरामय्या यांनाही भोवला. असाच अनुभव देवराज अर्स यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले गुंडू राव, रामकृष्ण हेगडे, एस. आर. बोम्मई, वीरेंद्र पाटील यांनाही आला.
चामराजनगरला भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते, असे वारंवार घडले आहे. त्यामुळे या शहराला ‘मुख्यमंत्र्यांची दफनभूमी’ म्हटले जाते. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री असताना चामराजनगरला भेट दिली होती. तिथे जाऊ नका, असे त्यांना सांगण्यात आले होते, पण त्यांनी ऐकले नाही आणि २० महिन्यांत त्यांचा कारभार आटोपला.
नंतर मुख्यमंत्री झालेले येडियुरप्पा व सदानंद गौडा यांनी चामराजनगरमध्ये पाऊल ठेवायचे धाडस केले नाही. पुढे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी २०१३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी चामराजनगरचा दौरा केला. त्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळून सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले. (वृत्तसंस्था)
>मोदींनीही
जाण्याचे टाळले
यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या, पण तेही चामराजनगरला गेले नाहीत. आपले पंतप्रधानपद जाईल, या भीतीने मोदी यांनी असे केले असावे, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली होती. मात्र, चामराजनगरच्या बाणाने अखेर सिद्धरामय्या यांनाच घायाळ केले. काँग्रेसचा पराभव होऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले.