चंपाई सोरेन यांनी निर्णय बदलला, भाजपमध्ये जाणार नाहीत; गुरुजींसोबत फोनवर बोलणे झाल्यानंतर निर्णय बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:47 PM2024-08-20T22:47:11+5:302024-08-20T22:49:13+5:30
गेल्या काही दिवसापासून चंपाई सोरेन पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, सोरेन आता पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री जेएमएम पक्षाचे नेते चंपाई सोरेन गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोरेन पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. चंपाई सोरेन यांनी जेएमएमचे सुप्रीमो गुरुजी शिबू सोरेन यांच्याशी फोनवर दोन वेळा संपर्क केला.यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याबाबतचा आपला निर्णय बदलला आहे.
चंपाई सोरेन म्हणाले की, शिबू सोरेन माझ्यासाठी देव आहेत. मी दिल्लीत भाजपच्या कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, असंही ते म्हणाले. मी काही वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीला आलो. भाजप नेत्यांना भेटण्याचा माझा कोणताही विचार नव्हता.
'पीडितेचे फोटो तात्काल हटवा', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे आदेश...
यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, हे सर्व कोण म्हणत आहे हे मला समजत नाही.
पक्षाचे सुप्रीमो गुरुजी शिबू सोरेन यांनी चंपाई यांच्याशी दोन वेळा चर्चा केली, यानंतर चंपाई सोरेन यांनी माघार घेतली. चंपाई म्हणाले की, मी भाजपमध्ये जाण्यासाठी दिल्लीला जात आहे, असे मी कधीच म्हटले नाही.
"माझी बदनामी करून माझी प्रतिमा डागाळली जात आहे. मी माझ्या मुलीला भेटायला दिल्लीला गेलो होतो. रक्षाबंधनासाठी तिथेच मुक्काम केला होता. मी कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही. मी नुकतेच माझ्या जिलिंगौडा घरी परतत आहे. मी रात्री उशिरा माझ्या घरी पोहोचेन, असंही सोरेन म्हणाले.
जेएमएमची स्थापना करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. आता पुढे काय करावं याचा विचारच केलेला नाही. घरी बसून निवांत विचार करूनच मी कोणताही निष्कर्ष काढेन. राजकारणातून संन्यास घ्यायचा की नाही याचा विचार करूनच निर्णय देईन, असंही सोरेन म्हणाले.
माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन अचानक दिल्लीला गेल्यानंतर झारखंडच्या राजकीय वर्तुळात ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेमुळे काँग्रेस, भाजप आणि झामुमोमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले.