चंपाई सोरेन यांनी दिला राजीनामा; JMM चे संस्थापक शिबू सोरेन यांना पत्रातून व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 09:20 PM2024-08-28T21:20:38+5:302024-08-28T21:21:09+5:30
Champai Soren Resigns: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
Champai Soren News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चचे (JMM) दिग्गज नेते चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दिल्लीहून रांचीला पोहोचल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. आता ते 30 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. चंपाई सोरेन यांच्यासोबत त्यांचा मुलगा बाबुलाल सोरेनदेखील भाजपमध्ये सामील होणार आहेत.
'जेएमएमची दिशा चुकली'
पक्षाचे संस्थापक शिबू सोरेन यांना पाठविलेल्या राजीनाम्याच्या पत्रात चंपाई सोरेन लिहितात की, "मला पक्षाची सध्याची कार्यशैली आणि धोरणांमुळे पक्ष सोडतोय. मला हे सांगाता खुप दुःख होतंय की, तुमच्या नेतृत्वात ज्या पक्षाचे स्वप्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिले होते, ज्या पक्षासाठी आम्ही आहोरात्र काम केले, तो पक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही. पक्षाची दिशा चुकली आहे."
आज झारखंड मुक्ति मोर्चा की प्राथमिक सदस्यता एवं सभी पदों से त्याग-पत्र दिया।
— Champai Soren (@ChampaiSoren) August 28, 2024
झारखंड के आदिवासियों, मूलवासियों, दलितों, पिछड़ों एवं आम लोगों के मुद्दों को लेकर हमारा संघर्ष जारी रहेगा। pic.twitter.com/ZpAmm2dopr
'हा निर्णय घेताना खुप वेदना होत आहेत'
"जेएमएम माझ्यासाठी एका कुटूंबासारखा होता. मला पक्ष सोडावा लागेल, असा विचार स्वप्नातही आला नव्हता. परंतु गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे मला हा कठीण निर्णय घ्यावा लागतोय. तुमच्या आरोग्यामुळे तुम्ही सक्रिय राजकारणापासून दूर आहात आणि तुमच्याशिवाय पक्षात असे कोणीही नाही, ज्यांच्याकडे आम्ही आमचे दु: ख सांगू शकतो. यामुळेच मी झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे. तुमच्या सानिध्यात झारखंड चळवळीदरम्यान आणि त्यानंतर खुप काही शिकायला मिळाले. तुम्ही नेहमी माझे मार्गदर्शक राहाल," असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
भाजपमधील कोणते पद मिळणार?
भाजपमध्ये चंपाई सोरेन यांची भूमिका काय असेल किंवा त्यांना कोणते पद दिले जाईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले होते की, भाजपमध्ये जे पद दिले जाईल, त्या पदावर काम करायला तयार असेन. मी कुठल्याही अटीशर्तीशिवाय भाजपामध्ये सामील होणार आहे. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी नवीन पक्ष स्थापनेचे संकेत दिले होते, पण नंतर आपला निर्णय बदलून अचानक भाजपमध्ये जाण्याचे ठरवले.