धो डाला... चंपारणच्या पठ्ठ्याचा विश्वविक्रम, पदार्पणातच झळकावलं तिहेरी शतक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 11:04 AM2022-02-19T11:04:00+5:302022-02-19T11:09:39+5:30
सकिबुल गनीने 405 चेंडूंच्या आपल्या खेळात 56 चौकार आणि 2 षटकार लगावत 341 धावांची खेळी केली. त्यामुळे, बिहारने 5 गड्यांच्या मोदबदल्यात 686 धावांवर डाव घोषित केला.
चंपारण - नुकतेच झालेल्या आयपीएलच्या लिलावात युवा खेळाडूंना मोठं मानधन देऊन अनेक संघमालकांनी आपल्या संघात घेतलं. त्यामध्ये, रणजी खेळणाऱ्या, अंडर 19 खेळणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना संधी मिळाल्या आहेत. आता बिहारमधील असाच एक रणजीपटू फलंदाज समोर आला आहे. सकिबुल गनी याने विश्वविक्रम केला असून मिझोरमविरुद्ध 341 धावांची खेळी केली. गनी हा डेब्यू प्रथम श्रेणी सामन्यात तिहेरी शतक झळकवणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
सकिबुल गनीने 405 चेंडूंच्या आपल्या खेळात 56 चौकार आणि 2 षटकार लगावत 341 धावांची खेळी केली. त्यामुळे, बिहारने 5 गड्यांच्या मोदबदल्यात 686 धावांवर डाव घोषित केला. या दर्जेदार खेळीमुळे मोतीहारीचा रहिवाशी असलेल्या 22 वर्षीय सकिबुलच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. तर, त्याच्या मित्रपरिवारानेही त्याचं अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. मोतीहारीच्या इलेव्हन स्टार क्रिकेट क्लबमधून सकिबुलने खेळाला सुरुवात केली होती. वयाच्या 8 वर्षांपासून त्यांने क्रिकेट खेळायला सुरूवात केली. घरात 4 भावांमध्ये तो सर्वात लहान असून मोठा भाऊ फैसल गनी हाही क्रिकेटर आहे. फैसलनेच सकिबुलला ट्रेनिंग दिली असून तोच मार्गदर्शक आहे.
सकिबुल हा प्रतिभावान क्रिकेटर आहे, अनेकदा चुका करतो पण समजावल्यानंतर तो चूक सुधारतो, असे फैसल याने म्हटले. तर, आई-वडिलांनीही त्यांना शुभेच्छा देत देशाचं आणि चंपारण मोतीहारीचं नाव रोशन करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, सकिबुलने यापूर्वी 14 लिस्ट आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी, एका लिस्ट सामन्यातही शतक झळकावले आहे.