बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी बाळू आनंद चोपडे यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 11:56 PM2018-02-02T23:56:17+5:302018-02-02T23:56:35+5:30
बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी मराठी माणूस स्थानापन्न झाला आहे.
नवी दिल्ली : बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी मराठी माणूस स्थानापन्न झाला आहे. बाळू आनंद चोपडे यांची बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळू चोपडे हे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सद्यस्थितीत कुलगुरू आहेत. चोपडे यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेल्या चोपडेंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014ला नियुक्ती करण्यात आली होती. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीड वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांना ही संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपतींनी हे पद भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. त्यामुळे त्या पदावर अखेर बाळू आनंद चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीचं पत्र आल्यानंतर राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे चोपडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर ते वाराणसीला बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी रुजू होण्यासाठी रवाना झाले आहेत.